बस आणि ट्रेनमधून अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. त्यांना पकडले की दंड आकारला जातो. प्रवाशांचं तिकीट काढलं नाही म्हणून अनेकदा बस कंडक्टरलाही कारवाईला सामोरं जावं लागतं. ‘फुकट्या’ प्रवाशांवर कारवाई करणं ठिक आहे, पण बसमधील प्रवाशासोबत असलेल्या कबुतराचं तिकीट काढलं नाही म्हणून कंडक्टरला चक्क मेमो दिल्याचा प्रकार तामिळनाडूमध्ये घडला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या एका अधिकाऱ्यानं ही कारवाई केली आहे.

एक प्रवासी कबुतराला घेऊन बसमध्ये चढला. बसमध्ये एकूण ८० प्रवासी होते. ही बस निश्चित ठिकाणी पोहोचली. तेथे असलेल्या तिकीट तपासनीसाने बसमधील प्रवाशांकडील तिकीटे तपासण्यास सुरुवात केली. एका प्रवाशाकडे कबूतर असल्याचं त्यानं पाहिलं. त्याचं तिकीट काढलंय का? अशी विचारणा संबंधित प्रवाशाला केली. त्यावेळी प्रवाशाने तिकीट तपासनीसाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यावर तपासनीसानं बस कंडक्टरलाच झापले. कबूतराचं तिकिट का काढलं नाही, असा जाब विचारला. पण कंडक्टरनं समाधानकारक उत्तर दिलं नाही. त्यामुळं त्याला मेमो देण्यात आला. बसमध्ये प्राणी आणि पक्ष्यांसाठीही तिकीट अनिवार्य आहे. पण हा नियम एखादा प्रवासी ३०हून अधिक प्राणी-पक्षी घेऊन प्रवास करत असेल तरच तो लागू होतो. त्यामुळं बस कंडक्टरवर करण्यात आलेली कारवाई चुकीची आहे, असं सांगण्यात येत आहे.

Story img Loader