केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आज, २२ जुलै रोजी सकाळी ९ वाजता सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर केला. यामध्ये उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.७१% आहे. अद्याप कोणतीही अधिकृत गुणवत्ता यादी जाहीर केली नसली तरी, बुलंदशहर येथील दिल्ली पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी तान्या सिंग सीबीएसई बारावी बोर्डामध्ये टॉपर ठरली आहे. तान्या सिंग सीबीएसई टॉपर झाल्याच्या बातमीला दिल्ली पब्लिक स्कूलच्या प्राचार्यांनी दुजोरा दिला आहे. तान्याला सीबीएसई बारावीच्या निकालात पूर्ण गुण मिळाले आहे.
सीबीएसईनुसार बारावीच्या एक लाख ३४ हजार ७९७ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत, तर ३३ हजार ४३२ विद्यार्थ्यांनी ९५% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. बारावीच्या आणखी एका विद्यार्थिनीने बारावी बोर्डामध्ये पूर्ण गुण मिळवून टॉप केले आहे. ती नोएडाच्या एमिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत असून तिचे नाव युवक्षी विग आहे. मात्र, अद्याप सीबीएसईने कोणतेही अधिकृत गुणवत्ता यादी जाहीर केली नसल्यामुळे, फक्त तान्या आणि युवक्षीच या वर्षी बारावीच्या सीबीएसई टॉपर्स आहेत की नाही याची खात्री झालेली नाही.
CBSE 10th Result 2022 : सीबीएसई दहावी बोर्डात ९४.४० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; जाणून घ्या निकाल
सीबीएसईने आज, २२ जुलै रोजी टर्म १ आणि टर्म २ या दोन्ही गुणांच्या आधारे अंतिम मार्कशीट तयार केली आहे. बारावीचा निकाल किंवा स्कोअरकार्डमध्ये शैक्षणिक वर्षात मिळालेले गुण असतात, ज्यात अंतर्गत मूल्यांकन, प्रकल्प कार्य, प्रात्यक्षिक परीक्षा आणि प्री-बोर्ड निकालांचा समावेश असतो.
यावर्षी सीबीएसईने दोन टर्ममध्ये परीक्षा घेतल्या. अंतिम निकालासाठी, लेखी पेपर्सच्या बाबतीत, टर्म १ ला ३०% आणि टर्म २ ला ७०% महत्त्व देण्यात आले आहे. प्रॅक्टिकलमध्ये, दोन्ही टर्म्सना समान महत्त्व देण्यात आले आहे.