सती प्रथेच्या संदर्भातील ट्विटमुळे वादामध्ये सापडलेल्या अभिनेत्री पायल रोहतगीचं नाव न घेता मुळची बांग्लादेशी ख्यातनाम लेखिका तसलिमा नासरिन यांनीही या वादात उडी घेतली आहे. तसलिमा नासरिन ह्यांनी ट्विट करत पायल रोहतगीला लक्ष केलं आहे. बरं झालं माझा कोणी नवराच नाही असं सांगत नासरीन यांनी पायल रोहतगीची खिल्ली उडवली आहे.

काय आहे तसलिमा नासरिन यांचे ट्विट –
सतीप्रथा पुन्हा सुरू व्हावी अशी काही भारतीय स्त्रियांची इच्छा असल्याचं मला समजलंय…हे खरंय का? एक बरंय की माझा कोणी नवराच नाहीये…त्यामुळे कोणीच मला पतीच्या चितेमध्ये उडी घेण्यासाठी कधीच बळजबरी करु शकत नाही.

काय आहे पायल रोहतगीचे ट्विट –
राजा राममोहन रॉय हे ब्रिटिशांची चमचेगिरी करत होते त्यांनी सती प्रथा बंद केली नाही. त्यांच्या काळात ती बंद झाली होती. त्यांनी फक्त ही प्रथा बंद करण्याचं श्रेय लाटलं जातेय. एवढंच नाही तर राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथा बंद केल्याचं श्रेय लुटलं मात्र प्रत्यक्षात ते ख्रिश्चन धर्माचा प्रसार करत होते. मी हिंदू समाजसुधारक आहे असा बुरखा त्यांनी पांघरला होता त्याच्या आडून ते ख्रिश्चन धर्माचा प्रसार करत होते. हिंदू धर्म कसा वाईट आहे त्यात कशा अनिष्ट प्रथा आहेत हे त्यांनी कायमच सांगण्याचा प्रयत्न केला आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी लोकांना उद्युक्त केले असाही आरोप पायल रहतोगीने केला आहे. सती प्रथा हिंदू धर्माचा भाग आहे हे त्यांनी आणि त्यांच्यासारख्या लोकांनी भासवले प्रत्यक्षात हे वास्तव नाही असेही पायलने म्हटले आहे.

पायल रोहतगीच्या या ट्विटनंतर तिच्यावर अनेकांनी टिकेचा भडीमार केला. काहींनी तिला इतिहासाचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला. काहींनी तिला स्त्री असून सती प्रथेचं समर्थन कसं करू शकतेस? असा प्रश्न विचारला आहे. एका नेटीझन्सने महापुरुषाचा अपमान केल्याप्रकरणी तिला अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

पायल रहतोगीने या संदर्भात याआधीही काही ट्विट आणि व्हिडिओ पोस्ट केले. ज्यानंतर तिला ट्रोल करण्यात आले. मात्र त्या ट्रोलिंगची कोणतीही पर्वा न करता पायलने पुन्हा एकदा व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि सतीची प्रथा राजा राममोहन रॉय यांनी बंद केली नाही. त्यांचा मुखवटा एक आणि वास्तव वेगळे होते असे म्हटले आहे.

Story img Loader