टाटा मोटर्स आणि टाटा समूह गेले काही महिने वेगळ्याच कारणामुळे चर्चेत असले तरी उद्या टाटा मोटर्सवर सगळ्यांच्या नजरा राहणार आहेत. कारण आहे ‘टाटा हेक्झा’ या गाडीचं लाँच. या गाडीचं कधी लाँच होतं याकडे कारप्रेमी तसंच वाहनक्षेत्रातल्या अनेक जाणकारांचं आणि कार कंपन्यांचं लक्ष आहे. टाटा नॅनो ला गेल्या काही वर्षांमध्ये मिळालेल्या थंड्या प्रतिसादामुळे कारक्षेत्रातला टाटांचा मार्केट शेअर कमी झालेला असला तरी ‘ब्रँड टाटा’वर असलेल्या विश्वासामुळे टाटांचं कुठलंही नवीन प्राॅडक्ट बाजारात नवे ट्रेंड्स निर्माण करतं.
!['टाटा हेक्झा'ची सगळ्यांना प्रतीक्षा](https://loksattawpcontent.s3.amazonaws.com/uploads/2017/01/tata-hexa-on-road-651x447.jpg)
टाटा हेक्झा ही एक ‘क्राॅसओव्हर’ कार आहे. क्राॅसओव्हरचा अर्थ हॅचबॅक आणि एसयूव्हीच्या सुवर्णमध्य. हॅचबॅक गाड्यांच्या (उदा. स्विफ्ट, आल्टो इत्यादी) ‘प्लॅटफाॅर्म’वर बनवण्यात आलेली पण एसयूव्हीसारखा वापर करता येण्याजोगी कार. बहुतेक सर्व मोठ्या गाड्या उदा. महिंद्र बोलेरो इ. एसयूव्ही म्हणजेच ‘स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल्स’ असतात. दमदार परफाॅर्मन्ससाठी त्या ओळखल्या जातात. टाटा हेक्झा हीसुध्दा क्राॅसओव्हर प्रकारातली दणकट गाडी आहे.
उद्या १८ जानेवारीला या गाडीचं लाँच होणार आहे.
![चांगले स्पेसिफिकेशन्स](https://loksattawpcontent.s3.amazonaws.com/uploads/2017/01/hexa-interior-processed.jpg)
या गाडीमध्ये २.२ लीटरचं वेरिकाॅर ४०० इंजिन आहे जे ४०० एनएमचा टाॅर्क देतं. टाटा हेक्सा १५६ बीएचपीची पाॅवर देते. या गाडीमध्ये ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसोबत ६ स्पीड आॅटोमॅटिक गिअरबाॅक्सही आहे.
![अनेक नवे फीचर्स](https://loksattawpcontent.s3.amazonaws.com/uploads/2017/01/Hexa-front-processed-651x447.jpg)
या गाडीत कितीतरी नवीन फीचर्स आहेत. एलईडी डे-टाईम रनिंग लाईट्स, हनीकोम्ब ग्रिल, प्रोजेक्टर हेडलँप, दणकट बाॅनेट ,क्रोम एक्झाॅस्ट अशी नवीन फीचर्स या कारमध्ये आहेत. याशिवाय सुरक्षेसाठी या गाडीत ६ एअरबॅग्स सोबत, ईबीडी यांसारख्या सोयी देण्यात आल्या आहेत.
या गाडीची किंमत १२ ते १८ लाखाच्या दरम्यान असण्याचा अंदाज व्यक्त होतोय. टाटा हेक्झाची महिंद्रा एक्सयूव्ही-५०० आणि महिंद्रा स्काॅर्पिओ या गाड्यांना तगडी टक्कर असेल असं म्हटलं जातंय.