आयकर अधिकाऱ्यांनी आंध्र प्रदेशमधल्या एका विक्रेत्याला वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) चुकवल्याबद्दल नोटीस पाठवण्यात आली आहे. बिलामध्ये त्याने १५ रुपयांचा जीएसटी चुकवला. त्याची हेराफेरी लक्षात आल्यानंतर त्याला २० हजारांचा दंड भरण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. ‘तुम्ही जाणीवपूर्वक वस्तू आणि सेवा कर कायद्याचं उल्लंघन केलं आहे आणि हा दंडनीय अपराध आहे ‘ असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
वाचा : क्रेडिट कार्डच्या व्यवहारात अडचणी येताहेत? ही कारणे असू शकतात…
या विक्रेत्याने बिलामध्ये जीएसटी कराची रक्कम नमूद केली नव्हती. दोन महिन्यांपूर्वी सरकारी अधिकाऱ्यांना जे विक्रेते जीएसटी चुकवतील अशांची यादी तयार करण्याचे आदेश दिले होते. यासाठी तब्बल २०० अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. करचुकवेगिरीला वचक बसावा यासाठी व्यापाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात आली होती. त्यानुसार कर चुकवणाऱ्या व्यापाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर किती रुपयांचा दंड आकारावा, हे कायद्यात नमूद करण्यात आलं नाही. त्यामुळे अशा व्यापाऱ्यांकडून किती दंड वसूल करावा याचा निर्णय अधिकाऱ्यांनी स्वत:च घेतला आहे.