करोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक लोकांना याची झळ बसली आहे. अशातच हरियाणामधील कुरुक्षेत्र येथे एक चकित करणारा प्रकार समोर आला आहे. चहाची टपरी चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या एका व्यक्तीकडे बँकेचे ५० कोटींचे कर्ज असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्या व्यक्तीलाच या कर्जाची माहिती नाही.

कुरुक्षेत्र येथील चहा विक्रेत्याचे नाव राजकुमार आहुवालिया असे आहे. ते चहाची टपरी चालवून घर चालवत असे. पण करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले. यातून मार्ग काढण्यासाठी ते ५० हजार रुपयांचे कर्ज घेण्यासाठी बँकेत गेला. त्यावेळी त्यांना बँकेने कर्ज देण्यास नकार दिला. कर्ज नाकारण्याचं कारण ऐकून राजकुमार यांना धक्काच बसला. त्यांच्या डोक्यावर आधीपासून ५० कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे त्यांना सांगितले. हे ऐकल्यावर राजकुमार यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

या संपूर्ण प्रकरणाविषयी राजकुमार यांनी एएनआयला माहिती दिली. “करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे माझी आर्थिक परिस्थिती खालावली होती. म्हणून मी कर्जासाठी बँकेकडे अर्ज केला. बँकेने माझा अर्ज नाकारला आणि मी आधीच ५० कोटी रुपयांचं कर्ज घेतले असल्याचे सांगितले. हे कसे शक्य आहे मला माहित नाही” असं त्यांनी सांगितलं.

राजकुमार यांनी बँकेकडे याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच बँक व्यवस्थापकानं तांत्रिक बिघाडामुळे हे झालं असावं, अशी शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, राजकुमार यांच्यावरील ५० कोटींच्या कर्जाचं वृत्त सगळीकडेच चर्चेचा विषय ठरू लागलं आहे.

Story img Loader