एका सरकारी शिक्षकाने बारावीच्या विद्यार्थ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक खूपच संतापले आहेत. ही घटना या महिन्यातील १३ ऑक्टोबर रोजी घडली. तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील शासकीय नंदनार बॉईज उच्च माध्यमिक शाळेतल्या या शिक्षकाने मुलाला मागच्या वेळी शाळेत आला नाही म्हणून अमानुषपणे मारहाण केली. विद्यार्थ्याचे केस पकडत जोरजोरात छडीचे फटके दिले. शिक्षकाच्या या तालिबानी कारनाम्याला वर्गातल्या मुलांनीच लपून रेकॉर्ड केलं. आता हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्यानंतर या राक्षसी वृत्तीच्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील चिदंबरम इथल्या उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक सुब्रमण्यम यांनी विद्यार्थ्याचे केस पकडून त्याला सतत छडीने मारहाण करताना दिसून येत आहेत. इतकंच नव्हे तर लाथ बुक्क्यांनी या विद्यार्थ्यांना बेदम मारल्याचा देखील आरोप करण्यात आलाय. यावेळी तो विद्यार्थी अगदी कळवळून वारंवार ‘पुन्हा चूक करणार नाही’ अशी विनवणी करताना दिसून येतोय. पण तरी सुद्धा या गुरू रूपातल्या राक्षसी शिक्षकाच्या मनाला पाझर फुटला नाही. शिक्षक त्याला लाथ मारत राहिला.
दरम्यान, वर्गातल्याच दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्या मोबाईलवर लपून या ही घटना कॅमेऱ्यात कैद केली आणि ती क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर अगदी आगीसारखा पसरू लागला. या व्हिडीओमधल्या राक्षसी शिक्षकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कडलोर जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. या व्हिडिओमध्ये मन हेलावून टाकणारे दृश्य असू शकतात.
मुख्याध्यापकांनी सांगितलं संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे?
‘द न्यूज मिनिट’शी बोलताना सरकारी शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले, ” गेल्या बुधवारी एकूण आठ विद्यार्थी शाळेत आले आणि पहिल्या तासात ते उपस्थित होते, पण दुसऱ्या तासात भौतिकशास्त्राच्या वर्गात ते सर्व विद्यार्थी उपस्थित राहिले नाहीत. शाळेचे शिक्षक सुब्रमण्यम हे वर्गात दररोज चाचणी परिक्षा घेत असल्याने या आठ विद्यार्थ्यांनी वर्गातच न जाण्याचा निर्णय घेतला. मी या विद्यार्थ्यांना शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर बसलेलं पाहिलं आणि त्यांना पुन्हा वर्गात नेलं. या आठही विद्यार्थ्यांना वर्गात बसण्याची परवानगी द्या, अशी मी शिक्षकाला विनंती केली. पण शिक्षक सुब्रमण्यम यांनी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर जाण्यास सांगितलं आणि वर्गात का बसले नाही असं विचारत त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यातल्या एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ त्याच वर्गातील इतर दोन मुलांनी रेकॉर्ड केला आहे. “
या व्हायरल व्हिडीओमधील पिडीत विद्यार्थी हा दलित समाजातील असल्याचं सांगण्यात येतंय. 17 वर्षीय दलित विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिक्षकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.