तुम्ही वर्गात आहात आणि हजेरीसाठी उभे राहिले नाहीत म्हणून तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला मारले आहे असे कधी घडले आहे का? मात्र हल्ली शाळांमध्ये काय घडते हा एक प्रश्नच आहे. कारण पालकांना थेट विद्यार्थ्यांच्या वर्गापर्यंत जाण्याची मुभा नाही, शाळांच्या नियमांनुसार ते योग्यही असेल. मात्र आता लखनऊ मधील ‘सेंट वियाने हायस्कूल’ मधील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. या शाळेतील एका शिक्षिकेने हजेरी देताना विद्यार्थी उभा राहिला नाही म्हणून त्याला एका पाठोपाठ एक मुस्कटात लगावल्या आहेत.

या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ ‘एनएनआय’ या वृत्तसंस्थेने ट्विटरवर पोस्ट केला आहे. मुलगा अल्पवयीन असल्याने त्याचा चेहरा ब्लर करण्यात आला आहे. मात्र या शिक्षिकेवर कारवाई केली जावी अशी मागणी आता मुलाच्या पालकांकडून होते आहे. हजेरी घेतली जात असताना उभे राहून हजर म्हणावे ही पद्धत अनेक शाळांमध्ये पूर्वीपासून आहे. मात्र एखादा विद्यार्थी हजेरीसाठी उभा राहिला नाही तर त्याला अशा प्रकारे मारणे हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न आता विचारला जातो आहे. इतकेच नाही तर शिक्षिकेने त्याला आधी तोंडी समज का दिली नाही असेही विचारले जाते आहे.

विद्यार्थी हजेरीसाठी उभा राहिला नाही म्हणून त्याला मारणाऱ्या या शिक्षिकेवर आता शाळा प्रशासन काही कारवाई करणार का? असा प्रश्न विचारण्यात येतो आहे. या शिक्षिकेचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. मात्र वर्गात असलेल्या सीसीटीव्हीमुळे हा प्रकार समोर आला आहे. हजेरी सुरू असताना या मुलाला झोप लागली होती का? हेही समजू शकलेले नाही. मात्र विद्यार्थ्याला समज न देता त्याला थेट मुस्कटात का लगावण्यात आल्या याचे उत्तर मिळू शकलेले नाही.

Story img Loader