देशभरातील अनेक विद्यार्थी शिक्षक भरती प्रक्रियेसाठी अहोरात्र मेहनत घेत असतात. अशावेळी लोकसेवा आयोगात अवघ्या चार जागा रिक्त असल्या तर हजारोंच्या संख्येने उमेदवार अर्ज करतात. यातून देशातील बेरोजगारीचे चित्र जनतेसमोर उघड होते. असाच प्रकार बिहारमध्ये दिसून आला आहे. सध्या सोशल मीडियावर बिहारमधील पाटणा जंक्शनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याला अनेकजण बेरोजगारीच्या स्थितीशी जोडून पाहत आहेत. या क्लिपमध्ये रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी दिसत आहे.
हा व्हिडीओ पोस्ट करताना असा दावा करण्यात आला की, बिहारमधील ‘शिक्षक भरती चाचणी’मध्ये इतके उमेदवार आले की, पाटणा जंक्शनवरील प्लॅटफॉर्म झाला जाम! सध्या ‘बिहार लोकसेवा आयोग’ (BPSC) वेगवेगळ्या पदांवर शिक्षकांची भरती करत आहे. त्यासाठी २४ ऑगस्टपासून परीक्षा सुरू झाल्या आहेत. यामध्ये बिहार व्यतिरिक्त इतर राज्यातील तरुणांनीही सहभाग घेतला आहे. मात्र या परीक्षांसाठी फक्त बिहारमध्येच केंद्रे देण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत २३ ऑगस्टच्या संध्याकाळपासूनच पाटणा जंक्शनवर उमेदवारांची गर्दी जमू लागली आहे, पण ही गर्दी इतक्या मोठ्याप्रमाणात वाढली की, चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाल्याचे दिसतेय. यामुळे काही वेळातच याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ही गर्दी नाही, बेरोजगारी आहे; युजर्सच्या कमेंट्स
हा व्हिडिओ २३ ऑगस्ट रोजी ‘बिहार शिक्षा मंच’ (@btetctet) च्या ट्विटर हँडलने पोस्ट केला होता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, BPSC शिक्षक परीक्षा… पाटणा जंक्शनची स्थिती पहा. हे ट्विटला आत्तापर्यंत ३ हजार लाईक्स मिळाले आहेत. तर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, काळाचे चक्र फिरले, देशातील विद्यार्थी बिहारमध्ये रोजगारासाठी येत आहेत. दुसर्याने लिहिले की, ही बिहारची चंद्र मोहीम आहे. काही युजर्सनी म्हटले की, सर्व परीक्षांवेळी इथे अशीच गर्दी असते. तर दुसऱ्या काही युजर्सनी म्हटले की, ही बेरोजगारी आहे, गर्दी नाही.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रेल्वे स्थानकावर तरुणांची प्रचंड गर्दी दिसत आहे. प्लॅटफॉर्मवर पाय ठेवायलाही जागा नाही, अशी परिस्थिती आहे. लोक कसेतरी प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण पायऱ्याही प्रवाशांनी खचाखच भरल्या आहे. अशा परिस्थितीत एक व्यक्ती असे म्हणताना ऐकू येते की, चला पुढे चला… नंतर व्हिडिओ बनवा. काही लोक पायऱ्यांवरून खाली उतरण्याचा प्रयत्न करत आहेत तर बहुतेक जण वर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या स्थितीमुळे एकाही प्रवशाला नीट चालण्यासाठी जागा नाही. पण या व्हिडीओवर, आरपीएफचे अधिकारी एएसआय कमलेश कुमार म्हणाले की, स्टेशनवर कोणताही गोंधळ झालेला नाही. पाटणा जंक्शनवर अशी गर्दी असामान्य नाही, इथे नेहमीच गर्दी असते.