Teacher running towards classroom to resolve fight Viral Video: सोशल मीडियावर दर दिवसाला अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आतापर्यंत आपण अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षकांचे शाळेत कविता शिकवतानाचे, मुलांना डान्स शिकवण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिलेच असतील. सोशल मीडियामुळे असे व्हिडीओ खूप चर्चेत येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान गाजतोय.
५ सप्टेंबर रोजी सर्वत्र शिक्षक दिन साजरा केला गेला. त्याच्याच काही आठवणी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर एका व्हिडीओच्या स्वरूपात शेअर केल्या आहेत. त्या व्हिडीओत एका शिक्षिकेचं विद्यार्थ्यांविषयीचं प्रेम दिसून येतंय.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल झालेल्या या व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. या व्हिडीओत, विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला सांगितलं की, काही जण वर्गात भांडण/मारामारी करीत आहेत. हे ऐकताच शिक्षिका धावत-पळत वर्गात पोहोचली. वर्गात पोहोचताच तिनं एका विद्यार्थ्याला तो भांडण करतोय, असं समजून पकडलं; पण तेवढ्यात सर्व विद्यार्थ्यांनी तिला सरप्राईज दिलं. ती येताच पार्टी पॉपर फोडून विद्यार्थ्यांनी तिचं वर्गात स्वागत केलं. टाळ्या वाजवून, तसेच पुष्पगुच्छ देऊन तिचा त्यांनी सत्कार केला. खास शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी प्लॅन करून शिक्षिकेला जबरदस्त सरप्राईज दिलं.
हा व्हिडीओ कराडमधील जयवंत इंटरनॅशनल स्कूलमधील दहावीची विद्यार्थिनी सरगमने @sargam_princesofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला होता. या व्हिडीओला तब्बल ६३.२ दशलक्ष व्ह्युज आणि ४.२ दशलक्ष लाइक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. ‘आठवणी… शिक्षक दिन विशेष… 2024-25 बॅच’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट्स करीत आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “या व्हिडीओमुळे मला रडू आलं. ही शिक्षिका नसून एक आईच आहे.” तर, दुसऱ्यानं “किती जबाबदार शिक्षिका आहे. ती खरंच या सेलिब्रेशनसाठी पात्र आहे.” तर एक जण कमेंट करीत म्हणाला, “तुम्ही शाळेची आठवण करून दिलीत.”
दरम्यान, शाळा-कॉलेजमधील शिक्षकांचे असे अनोखे व्हिडीओ याआधीही अनेकदा व्हायरल झाले आहेत. परंतु, या व्हिडीओची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाली.