दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना भारताने आपल्या खिशात घातला आहे. पहिल्या सामन्यात भारताने ११३ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. विजयसासह भारताने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीला आलेल्या केएल राहुलने दमदार कामगिरी करत पहिल्या डावात शतक झळकावलं. त्यासोबत मयंक अग्रवाल आणि अजिंक्य रहाणे यांनी चांगली फलंदाजी केली. या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांचं वर्चस्व दिसून आलं. वेगवान गोलंदाजांनी दोन्ही डावात मिळून २० पैकी १८ गडी बाद केले. मोहम्मद शमीने एकूण ८ गडी बाद केले. यात पहिल्या डावातील पाच बळींचा समावेश आहे. तर फिरकीपटू आर. अश्विनने दुसऱ्या डावात दोन गडी बाद केले.

दक्षिण अफ्रिकेतील सेंच्युरियनमध्ये टीम इंडियाचा पहिलाच विजय आहे. या विजयासह विराट कोहली दक्षिण अफ्रिकेत दोन कसोटी सामने जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. या विजयाचा आनंद भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर दिसत होता. विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू रिसॉर्टमध्ये पोहोचताच त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. स्वागतासाठी लावलेल्या गाण्याच्या तालावर नाचायला खेळाडू पुढे सरसावले. मनोसोक्तपणे हॉटेल स्टाफ आणि काही लोकांसोबत डान्स केला. चेतेश्वर पुजारा आणि मोहम्मद शमीने नाचून आनंद व्यक्त केला. हा व्हिडिओ आर. अश्विनने इन्स्टाग्राम अकॉउंटवर शेअर केला आहे. “नेहमीच्या मॅचचे फोटो कंटाळवाणे झाले आहेत म्हणून हा व्हिडिओ शेअर केला. चेतेश्वर पुजाराने मोहम्मद शमीसोबत डान्स करत आनंद लुटला. काय विजयोत्सव साजरा केला”, अशी पोस्ट आर. अश्विनने लिहिली आहे.

दुसरा कसोटी सामना दक्षिण अफ्रिकेतील जोहन्सबर्ग मैदानात ३ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान खेळला जाणार आहे. तर केपटाउनमध्ये तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. भारताने पहिला सामना जिंकल्याने दक्षिण अफ्रिका संघावर दडपण आलं आहे. आता उर्वरित दोन पैकी दोन सामने जिंकत किंवा एक सामना जिंकत एक ड्रा करण्याचं आव्हान दक्षिण अफ्रिका संघासमोर असेल.