भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी ट्वेन्टी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव पुन्हा तळपला. आयसीसीच्या क्रमवारीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट (T-20) मध्ये अव्वल स्थानी असलेल्या सूर्यकुमारचा रविवारी झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा झंझावात पाहायला मिळाला. सूर्यकुमारने न्यूझीलंड विरुद्ध वादळी खेळी करुन टी ट्वेन्टी मधील दुसरं शतक ठोकून संपूर्ण क्रिडाविश्वातून वाहवा मिळवली. ३६० डिग्री प्लेयर म्हणून नावाजलेल्या सूर्यकुमारने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत ५१ चेंडूत १११ धावांचा पाऊस पाडला. त्यामुळे भारताने यजमान न्यूझीलंडचा ६५ धावांनी पराभव केला. सूर्यकुमारने टी ट्वेन्टी मधील ४१ सामन्यांमध्ये १३९५ धावा कुटल्या आहेत. यामध्ये त्याची सरासरी ४५ असून स्ट्राईक रेट १८० हून अधिक आहे.
सूर्यकुमार यादव फक्त टी ट्वेन्टी क्रिकेटमध्येच चमकला नाही, तर त्याने वन डे क्रिकेटमध्येही अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने तेरा सामन्यांमध्ये ३४ च्या सरासरीनं ३४० धावा केल्या आहेत. त्यामुळे व्हाईट बॉल क्रिकेटमध्येही सूर्यकुमारने त्याचा जलवा दाखवला आहे. पण आता प्रतीक्षा आहे ती, रेड बॉल क्रिकेटच्या पदार्पणाची…टेस्ट क्रिकेटच्या पदार्पणाबाबत सूर्यकुमारला विचारलं असता, ‘आता ती वेळ लवकरच येणार आहे’, असं त्याने म्हटलं.
आणखी वाचा : याला म्हणतात प्रेम! फुटपाथवरील जोडप्याचा Viral Video पाहून सारेच झाले भावूक
कसोटी क्रिकेटच्या पदार्पणाबाबत सूर्यकुमार म्हणाला….
‘आ रहा है, आ रहा है’ वो टाईम भी आ रहा है, म्हणजेच जेव्हा आम्ही क्रिकेट सुरु करतो तेव्हा रेड बॉलनेच खेळतो. मुंबईच्या संघासाठीही मी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलं आहे. त्यामुळे रेड बॉल क्रिकेटच्या फॉर्मेटची मला चांगली कल्पना आहे.मला या फॉर्मेटमध्येही खेळायला खूप आवडतं. मला आशा आहे, कसोटी क्रिकेटमध्येही माझं पदार्पण लवकरच होईल. जेव्हा आम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात करतो, तेव्हा रेड बॉलचाच वापर केला जातो, असं सूर्यकुमार यादव न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाला.