गेल्या आठवड्यात ५ जुलै रोजी जगज्जेत्या टीम इंडियाची मुंबईत विजयी मिरवणूक काढण्यात आली. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ही मिरवणूक काढली गेली. त्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये टीम इंडियातील खेळाडूंचा भव्य सत्कारही करण्यात आला. या मिरवणुकीदरम्यान झालेली गर्दी हा चर्चेचा विषय ठरला होता. एकीकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या उत्साहाचं कौतुक केलं जात असताना गर्दीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवरही बोट ठेवलं जात आहे. त्यातच, या गर्दीत अनेकांना श्वास गुदमरल्याचा त्रास झाल्याचं निदर्शनास आलं. अशाच एका महिलेचा व्हिडीओ आणि तिला वाचवणारा मुंबई पोलीस हवालदार चर्चेचा विषय ठरले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय घडलं होतं मिरवणुकीदरम्यान?

५ जुलै रोजी मुंबईत भारतीय संघ दाखल झाल्यानंतर त्यांची मरीन ड्राईव्हवर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येनं मुंबईकर क्रिकेट चाहते मरीन ड्राईव्हवर जमा झाले होते. तेव्हा काही लोकांना श्वास गुदमरल्याचा त्रास जाणवू लागला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. रस्त्यावर उभे केलेल्या बॅरिकेट्सजवळ एक महिला उभी राहून आपल्या संघासाठी घोषणा देत होती. पण गर्दीमुळे या महिलेला चक्कर येऊन ती बेशुद्ध पडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.

या व्हिडीओत सदर महिलेला एका पोलीस हवालदारानं खांद्यावर उचलून गर्दीतून बाजूला नेल्याचं दिसत आहे. हे पोलीस हवालदार कोण? याचीही चर्चा सुरू झाली. आता मुंबई पोलिसांनीच आपल्या या कार्यक्षम हवालदाराचा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये संबंधित हवालदार सईद पिंजारी यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे.

टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईत गर्दीचा महापूर, महिलला आली चक्कर, व्हिडीओ व्हायरल

“आम्हाला ती महिला बेशुद्ध अवस्थेत दिसली आणि…”

सईद पिंजारी यांनी त्या दिवशी घडलेला प्रसंग या व्हिडीओमध्ये सांगितला आहे. “माझं नाव सईद सलीम पिंजारी. त्या दिवशी मी बंदोबस्तावर असताना मला व माझ्यासोबतच्या एका महिला कॉन्स्टेबलला एक महिला बेशुद्ध अवस्थेत दिसली आणि आम्ही तातडीनं आमची जागा सोडून तिच्या दिशेनं गेलो. आम्ही तिला उचलून गर्दीपासून लांब नेलं जेणेकरून तिला तिथे श्वास घेण्यास त्रास होणार नाही. तिथे आम्ही तिला पाणी पाजलं. चॉकलेट दिली. त्या महिलेला बरं वाटेपर्यंत आम्ही तिथेच थांबलो. त्यानंतर तिला आम्ही रुग्णवाहिकेत नेण्यासाठी पाठवलं”, असं सईद पिंजारी यांनी सांगितलं.

“..ही देवाचीच कृपा”

दरम्यान, मुंबई पोलिसात असल्याचा अभिमान व्यक्त करतानाच सईद पिंजारी यांनी आपण हे करू शकलो ही देवाचीच कृपा असल्याचं म्हटलं आहे. “ती देवाची कृपा आणि आमच्या प्रशिक्षणाचा एक भागच होता की मला देवानं तेवढी शक्ती दिली आणि मी माझं कर्तव्य पार पाडू शकलो. मला गर्व आहे की मी मुंबई पोलिसात आहे”, असं सईद पिंजारी यांनी नमूद केलं.

काय आहे मुंबई पोलिसांच्या पोस्टमध्ये?

मुंबई पोलिसांनी आपल्या पोस्टमध्ये हवालदार सईद पिंजारी यांचं कौतुक केलं आहे. “विजयी मिरवणुकीच्या बंदोबस्तादरम्यान हवालदार सईद पिंजारी हेच आमचे खरे ‘मॅन ऑफ द मॅच’ आहेत”, असं मुंबई पोलिसांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team india victory rally in mumbai rush woman unconscious viral video mumbai police instagram post pmw
Show comments