एखाद्या नेत्याने कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आल्यानंतर प्रकल्पाचे उद्घाटन कात्रीने रिबिन कापून केल्याचं अनेकदा पहायला मिळतं. नेते अनेकदा या अशा उद्घाटन प्रसंगांचे फोटो आपल्या सोशल नेटवर्किंगव पेजेसवरुन, अकाऊंटवरुन शेअर करत असतात. मात्र सध्या तेलंगणचे मुख्यमंत्री के. चेंद्रशेखर राव यांचा एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री एका कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचले असता त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र ऐनवेळी कात्रीच सापडली नाही आणि त्यानंतर काय घडलं यासंदर्भातील हा व्हिडीओ दिसत आहे आहे.

झालं असं की राव हे राजन्ना सिरिकिल्ला जिल्ह्यामध्ये मिशन भागीरथा प्रोजेक्ट अंतर्गत गरीबांसाठी टू बीएचकेची घरं बांधण्यात आली आहेत. येथील थांगपल्ली गावातील मीडिपल्ली भागात बांधण्यात आलेल्या याच इमारतींच्या उद्घाटनासाठी राव पोहचले होते. रविवारी सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमात राव यांच्या हस्ते रिबिन कापून या प्रकल्पातील घरांचा ताबा लाभार्थ्यांना देण्यात येणार होता. मात्र मुख्यमंत्री प्रकल्पाचं उद्घाटन करण्यासाठी एका फ्लॅटच्या दारासमोर उभे राहिले. बराच वेळ ते कोणीतरी आपल्या हाती कात्री देईल याची वाट पाहत होते. उद्घटनासाठी उभ्या राहिलेल्या राव यांना कात्री देण्यासाठी अधिकाऱ्यांची आणि उपस्थितांची धावपळ सुरु झाली. राव यांच्या बाजूलाच उभं राहून अधिकारी कात्रीसंदर्भात ओरडून ओरडून विचारणा करत होते. मात्र काही मिनिटं उभं राहूनही कात्री न आल्याने शेवटी संतापून राव यांनी आपल्या हातानेच दरवाजाच्या चौकटीवर लावलेली रिबिन एका बाजूने खेचून काढली. कात्री न मिळाल्याने हातानेच रिबिन बाजूला सारुन उद्घाटन करत राव यांनी लाभार्थींच्या लहान मुलांसहीत फ्लॅटमध्ये प्रवेश केला. राव हे त्यांच्या शिघ्रकोपी स्वभावासाठी ओळखले जातात.

सरकारने ८० कोटी रुपये खर्च करुन मीडिपल्ली येथील २६ एकर जमीनीवर १ हजार ३२० टू बीएचके घरं बांधली आहेत. कापड गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या आणि बेघर गरिबांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे. याच प्रकल्पाचं उद्घाटन राव यांच्या हस्ते होते. त्यांनी सहा लाभार्थ्यांना घराची कागपत्रंही दिली. मात्र ऐनवेळी कात्री न मिळाल्याने त्यांनी प्रकल्पाचे उद्घाटन रिबिन हाताने खेचून केलं. सध्या सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.

Story img Loader