राज्य: तेलंगण…जिल्हा: करिमनगर…शहर: जमिकुंटा… सकाळची वेळ…रस्त्यांवर परिवहन सेवेच्या बस…स्कूल बस…शाळेत जाणाऱ्या मुलांची गर्दी…पादचारी…मोटरसायकली…कारची वर्दळ…घड्याळात ७.५४ वाजले की हे सारं काही थांबतं. ५२ सेकंद सगळेच एकाच जागी उभे असतात. येथे रोज सकाळी ‘जन-गण-मन’ या राष्ट्रगीताचं सामूहिक गायन होतं. शहरातील महत्त्वाच्या १६ ठिकाणी असलेल्या ध्वनिक्षेपकांवरून ते वाजवलं जातं. हजारो लोक या उपक्रमात सहभाग घेतात. या शहरात सुरू केलेल्या या उपक्रमाचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

जमिकुंटा या शहरात १६ ऑगस्टपासून या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. देशभक्तीचं दर्शन या उपक्रमातून घडतंय. पोलीस निरीक्षक पी. प्रशांत रेड्डी यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. शहरातील ९० टक्के लोक राष्ट्रगीत गाऊ शकत नसल्याचं आढळून आलं. देशभक्ती जागृत करणं हाच केवळ या उपक्रमाचा हेतू नसून आपलं राष्ट्रगीत सर्वांनाच म्हणता यावं, असं वाटतं. गेल्या वर्षभरापासून मी येथील लोकांशी संवाद साधत आहे. बहुतांश लोकांना राष्ट्रगीत म्हणता येत नाही असं माझ्या लक्षात आलं, असं रेड्डी यांनी सांगितलं. केवळ देशभक्ती जागृत करणं हा उपक्रम सुरू करण्यामागील हेतू नाही, तर देशासाठी आपणही काही करावं या जबाबदारीची जाणीव लोकांना व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे, असंही त्यांनी सांगितलं. या उपक्रमाला सर्वच स्तरांतून चांगला प्रतिसाद मिळत असून कौतुकाची थापही मिळत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

 

शहरातील गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी ‘राष्ट्रगीत’ हे सर्वोत्तम साधन आहे, असा मला वाटतं. सकाळी राष्ट्रगीत सुरू असताना सर्व नागरिक काही सेकंद एका जागी थांबतात. एखादी व्यक्ती गुन्हा करण्याच्या उद्देशानं बाहेर पडत असेल तर तीही व्यक्ती राष्ट्रगीत सुरू असताना थांबते. त्यामुळं ‘मनपरिवर्तन’ होऊन ती व्यक्ती गुन्हा करण्यापासून परावृत्त होऊ शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, आपण एखादा गुन्हा केला तर समाजाचं नुकसान होतं, अशी जाणीव संबंधित व्यक्तीला होते, असंही त्यांनी सांगितलं. देशातील प्रत्येक व्यक्तीमध्ये देशाभिमान जागृत झाला तर ‘निर्भया’सारख्या घटना घडणारच नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सकाळी-सकाळी राष्ट्रगीत गायलं तर खूपच प्रसन्न वाटतं असं काही लोक सांगतात, असंही त्यांनी सांगितलं.

 

Story img Loader