शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक जण नोकरीच्या शोधात आपली काही वर्ष खर्च करतात. नोकरी मिळाली की, हवा तसा पगार मिळत नाही. त्यामुळे उतार वयापर्यंत काम करावं लागतं. मात्र दहा वर्षांच्या मुलीची कमाई पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तिची कमाई पाहता वयाच्या १५ व्या वर्षी आरामात निवृत्ती घेऊन जीवन जगू शकते. मुलीकडे या वयातच १ कोटी ४० लाखांची मर्सिडीज गाडी आहे. पिक्सी कर्टिस नावाच्या मुलीला व्यवसाय सुरु करण्यासाठी तिची आई रॉक्सीने मदत केली. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, मागच्या एका महिन्यात पिक्सीने १ कोटी ४ लाखाहून अधिक कमाई केली आहे. ‘मिरर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, ऑस्ट्रेलियाची राहणारी पिक्सी तिच्या आईसोबत फिजेट्स आणि रंगीबेरंगी पॉपिंग खेळणी बनवते. या खेळण्यांना पुरवठ्यापेक्षा अधिक मागणी आहे. पिक्सीच्या नावावर एक हेअर ऍक्सेसरी ब्रँड देखील आहे जो तिची आई रॉक्सीने स्वतः बनवला आहे. यात अतिशय स्टाइलिश आणि सुंदर हेडबँड, क्लिप आणि इतर वस्तूंचा समावेश आहे.
“माझ्यासाठी सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे माझ्या मुलीमध्ये एवढ्या लहान वयात असलेली उद्योजकता आहे. ही प्रतिभा माझ्यात कधीच नव्हती. मलाही यशस्वी व्हायचे होते. पण माझ्या मुलीने इतक्या कमी वयात व्यवसाय यशस्वी करून माझे स्वप्न पूर्ण केले आहे.”, असं पिक्सीच्या आईने सांगितले. “मी स्वतः १४ वर्षांची होती, त्यावेळी ती मॅकडोनाल्डमध्ये काम करत होती. आणि पगारदार माणूस जेवढे कमवू शकतो तेवढेच मिळवायचे. माझ्या मुलीमुळेच मला उद्योजक बनण्याची संधी मिळाली. आणि माझ्या मुलीला एवढ्या लहान वयात सगळं मिळालं ही आनंदाची गोष्ट आहे, जी मला आता मिळत आहे.”, असंही तिने पुढे सांगितलं.
पिक्सीचे वडील एक यशस्वी उद्योजक आहेत. रॉक्सी आणि ओलिवर कर्टिस यांचं २०१२ साली लग्न झालं होतं. दाम्पत्य ४९ कोटी ७२ लाख रुपये किंमत असलेल्या हवेलीत राहते.