Railway Accident of employee: दररोज लाखो लोक ट्रेनमधून प्रवास करतात. यादरम्यान अनेकदा ट्रेनमध्ये चढताना उतरताना अनेकांचे अपघात होतात. यात काही गंभीर जखमी होतात तर काहींच्या नशिबात मृत्यूच येतो. अशा अपघातांचे अनेक व्हिडीओ कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, जे पाहून अंगावर अक्षरश: काटा येतो. सध्या एक अशीच गंभीर घटना घडली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात कोणत्या प्रवाशाचा नाही तर चक्क रेल्वे कर्मचाऱ्याचाच अपघात होऊन मृत्यू झाला आहे.
बिहारमधील बरौनी जंक्शन येथे शनिवारी सकाळी रेल्वे प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे एका रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जंक्शनवर बोगी आणि इंजिन वेगळं करत असताना कामगाराचा इंजिन आणि बोगीमध्ये चिरडून मृत्यू झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. सुमारे दोन तास तो इंजिन आणि बोगीमध्ये अडकून होता असे वृत्त आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बरौनी जंक्शन येथील फलाट क्रमांक ५ वर घडली. समस्तीपूर जिल्ह्यातील दलसिंगसराय येथील रहिवासी असलेले अमर कुमार (३५) जे रेल्वे कर्मचारी होते, ते लखनौ-बरौनी एक्स्प्रेसचे (ट्रेन क्र. १५२०४) इंजिन जोडण्याचा प्रयत्न करत होते; जी ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर आली. प्रवासी ट्रेनमधून उतरले आणि अमर कुमार इंजिन जोडत असताना चालकाने चुकून समोरच्या दिशेने जाण्याऐवजी उलट दिशेने ट्रेन हलवली.
इंजिन आणि बोगीमध्ये चिरडून अमर कुमारचा मृत्यू झाला आणि सुमारे दोन तास तो तिथेच अडकून राहिला. प्रवाशांनी अपघात झाल्याचा इशारा देताच चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अपघात झाल्याचं लक्षात येऊनही चालकाने पुढच्या दिशेने इंजिनही हलवले नाही, कदाचित यामुळे अमरचा जीव वाचला असता. इंजिन हलवून रेल्वे कर्मचाऱ्याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांना दोन तास लागले.
पाहा व्हिडीओ
हा व्हायरल व्हिडीओ @SachinGuptaUP या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
या घटनेने प्रवासी आणि मृताच्या कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. इतर रेल्वे कर्मचारीही घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाचा निषेध केला. सोनपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) देखील घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले.