Shocking video : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते आहे. काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. गाडीवर जाणाऱ्यांचा पाठलाग असो, किंवा रस्त्यावरून जात असाल तरीही भटके कुत्रे हे टोळीने हल्ला करीत आहेत. शांतता असेल आणि एखादी व्यक्ती किंवा लहान मुले एकेकटी जात असली की, हे कुत्रे त्यांचेच राज्य असल्याप्रमाणे अंगावर धावून येत हल्ला करतात. त्यामुळे आजवर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. भटक्या कुत्र्यांचे माणसांवर हल्ला चढविण्याचे हे प्रमाण खूपच वाढत आहे. अशातच आता हैदराबादच्या मणिकोंडा शहरात तब्बल १५ कुत्र्यांनी एकत्रितपणे एका महिलेवर हल्ला केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

हैदराबादच्या मणिकोंडा येथे शनिवारी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेली एक महिला कुत्र्याच्या हल्ल्याची शिकार झाली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सुमारे १५ कुत्र्यांनी महिलेवर हल्ला केला. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, महिलेला जवळपास १५ कुत्र्यांनी घेरले आहे आणि ते सतत तिच्यावर हल्ला करीत आहेत, लचके तोडत आहेत आणि चावण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यानंतर ती महिला घाबरून कुत्र्यांच्या त्या टोळक्यापासून स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. माणिकोंडा भागातील चित्रापुरी हिल्स येथे सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही महिला मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडली होती तेव्हा ही घटना घडली.

ती महिला स्वत:चा बचाव करताना आणि चप्पल मारीत कुत्र्यांना तिच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. महिलेने तिची चप्पल एका हातात धरली आहे आणि ती कुत्र्यांना मारत आहे आणि त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. एक मिनिटापर्यंत ही महिला जीव वाचविण्यासाठी लढत राहिली, किंचाळत राहिली; मात्र अशा जीवघेण्या परिस्थितीतून त्या महिलेची सुटका करण्यासाठी तिच्या मदतीला घटनास्थळी कोणीही उपस्थित नव्हते. त्या कुत्र्यांना प्रतिकार करताना शेवटी ती दमली आणि जमिनीवर पडली. मात्र, पुढच्याच क्षणी ती महिला उठली आणि पुन्हा कुत्र्यांपासून स्वतःचा बचाव करू लागली. काही वेळाने ती महिला एका सोसायटीच्या गेटजवळ गेली. तेव्हा एक जण स्कूटरवरून घटनास्थळी आला आणि त्याने महिलेचा पाठलाग करणाऱ्या सर्व कुत्र्यांना हाकलून दिले. या महिलेने मोठ्या हिमतीने कुत्र्यांच्या तावडीतून स्वत:च्या सुटकेसाठी निकराचे प्रयत्न केले; मात्र या हल्ल्यात तिला गंभीर दुखापत झाली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: भयावह! आयुष्य देणारेच जीवावर उठले, वृद्ध रुग्णाला क्रूर मारहाण; सीसीटीव्ही कॅमेरा बघताच कर्मचारी फरार

महिलेच्या पतीने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि दावा केला की परिसरात कुत्र्यांचा त्रास वाढत आहे आणि अलीकडच्या काळात अनेक मुले कुत्र्यांच्या हल्ल्याला बळी पडली आहेत. त्यांनी सोसायटीतील रहिवाशांना परिसरातील कुत्र्यांना खायला न देण्याचे आवाहन केले. कारण- त्यामुळे परिसरातील इतर लोकांना त्रास होतो. सुदैवाने ही घटना एका महिलेसोबत घडली; पण जर ही घटना एखाद्या लहान मुलासोबत घडली असती, तर कदाचित त्या मुलाला या कुत्र्यांपासून आपला जीव वाचवता आला नसता. संपूर्ण देशभरात भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळत असून, व्हिडीओ पाहून नेटकरीही संताप व्यक्त करीत आहेत.