अनेकदा बसमधून सीटच्या संख्येपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत असल्याचे दिसून येते. गरजेपेक्षा जास्त लोक असल्याने काही प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागतो. अनेकदा तर गर्दीमुळे दरवाजात लटकूनही प्रवाशांना प्रवास करावा लागतो. नियमानुसार बस सुरू होते तेव्हा तिचे दरवाजे पूर्णपणे बंद गरजेचे असते. पण, अनेकदा चालत्या बसचे दरवाजे उघडे ठेवले जातात आणि त्यामुळे प्रवासी बसमधून पडण्याचे प्रकार घडतात. असाच काहीसा प्रकार तमिळनाडूतील नमक्कलमध्ये पाहायला मिळाला. येथे एक महिला चक्क चालत्या बसच्या दरवाजातून बाहेर पडली. ही दुर्घटना घडली त्यावेळी बसचा वेग खूप जास्त होता आणि त्यामुळे महिला काही अंतर दूर फेकली गेली.
ही दुर्घटना बसमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यात महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे; जो पाहून तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल.
शारदा असे अपघातग्रस्त महिलेचे नाव आहे. ती जेदरपलायम येथून सालेम येथे कपडे खरेदी करण्यासाठी गेली होती. यावेळी खरेदी करून ती खासगी बसने घरी परतत होती. बसने कक्कवेरी ओलांडताच चालकाने अचानक बस वळवली. याच वेळी शारदा बसमधून खाली पडल्या. त्या बसपासून सुमारे २० फूट अंतरावर जाऊन पडल्या. या दुर्घटनेमुळे हादरलेल्या प्रवाशांनी ओरडाओरड करण्यास सुरुवात केली आणि वाहकाला त्याची माहिती दिली. त्यानंतर बस थांबवण्यात आली.
त्यानंतर प्रवाशांनी शारदा यांच्या दिशेने धाव घेत त्यांना मदत केली. लगेच त्यांना सालेम येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या दुर्घटनेत शारदा यांचा जीव वाचला; पण त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. या दुर्घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.
समोर आलेल्या या घटनेच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अनेक महिला बसमध्ये उभ्या राहून प्रवास करीत असल्याचे दिसत आहे. त्यात शारदाही अगदी बसच्या दरवाजासमोर हॅण्डलला पकडून उभ्या होत्या. त्यात बसचा दरवाजा उघडा होता. बसच्या पुढच्या बाजूला महिला आणि मुले उभी आहेत; तर काही पुरुष मागच्या बाजूला उभे आहेत. यावेळी शारदादेखील बसमधील खांबाला पकडून उभ्या राहिल्या होत्या. मात्र, बस वळल्यावर त्यांचा तोल गेला आणि त्या दारातून खाली पडल्या. हे पाहून लोक घाबरले आणि त्यांनी वाहकाला बस थांबविण्यास सांगितले.
व्हिडीओच्या दुसऱ्या भागात शारदा किती वेगाने खाली पडल्या हे दिसले. बस थांबल्यानंतर लोक त्यांच्या दिशेने धावले. त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले.