थायलंडमधील बँकॉक शहरातील दोन रेस्टॉरंट मालकांना ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी ७२३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. Laemgate Infinite या रेस्टॉरंटचे मालक Apichart Bowornbancharak आणि Prapassorn Bawornban यांनी आपला धंदा वाढावा यासाठी एक स्किम लागू केली. सर्वात कमी किमतीमध्ये सी-फूड अशी स्किम आखत दोन्ही मालकांनी आपल्या ग्राहकांना व्हाऊचर्स वाटली. या व्हाऊचर्ससाठी ग्राहकांना आधी पैसे देणं बंधनकारक करण्यात आलं. या स्किमची जाहीरात दोन्ही मालकांनी फेसबूक पेज व अन्य सोशल मीडियावरही केली. सर्व ग्राहकांकडून व्हाऊचरसाठी ८८ बाथ (भारतीय रुपयांमध्ये अंदाजे २१५ रुपये) घेण्यात आले.
बँकॉक शहरातील जवळपास २० हजार लोकांनी ही व्हाऊचर्स खरेदी केली. सुरुवातीला काही ग्राहकांना ठरल्याप्रमाणे सी-फूड मिळालं. मात्र यानंतर ग्राहकांना आपल्या सी-फूड साठी महिनो-महिने वाट पहावी लागत होती. काही दिवसांनी रेस्टॉरंटच्या दोन्ही मालकांनी आपली ऑफर रद्द करत आपल्याला मोठ्या प्रमाणात सी-फूड मिळत नसल्याचं सांगितलं. दोन्ही मालकांनी उरलेल्या ग्राहकांचे पैसे परत करण्याचीही तयारी दाखवली. ठरल्याप्रमाणे तक्रार केलेल्या ८१८ ग्राहकांपैकी ३७५ ग्राहकांना त्यांचे पैसे परत देण्यात आले. मात्र ज्यांना पैसे मिळाले नाहीत, त्यांनी रेस्टॉरंटच्या दोन्ही मालकांविरोधात तक्रार दाखल केली.
कोर्टासमोर रेस्टॉरंट मालकांच्या वकीलांनी आपली बाजू मांडताना, ग्राहकांच्या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मासळी मिळणं शक्य होत नसल्यामुळे ही स्किम बंद करण्यात आल्याची बाजू मांडली. अखेरीस कोर्टाने दोन्ही मालकांना ग्राहकांची फसवूणक, खोटी जाहीरात केल्याप्रकरणी दोषी ठरवलं. दोन्ही मालकांनी आपला गुन्हा कबूल केल्यानंतर त्यांच्या कारावासाची शिक्षा कमी करुन ७२३ वर्ष करण्यात आली. याव्यतिरीक्त दोन्ही मालकांना १८ लाख ७ हजार ५०० बाथचा दंड ठोठावण्यात आला. थायलंडमध्ये आरोपींना शेकडो वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्याचा कायदा आहे. मात्र यानंतर आरोपीचं वर्तन सुधारल्यास २० वर्षांनंतर त्यांची सुटका करण्यात येते.