पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी सोशल मीडियावर मोदींविरोधात अपमानास्पद विधान केले होते. त्यानंतर भारत आणि मालदीव या दोन देशांत वाद सुरू झाला; ज्याचा मोठा फटका मालदीवला बसला. या पार्श्वभूमीवर आता थायलंडमधून भारतीयांविषयी अपमानस्पद विधान करणाऱ्या कॅब ड्रायव्हरचा एक संतापजनक व्हिडीओ व्हायरल होत आहे. थायलंडमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या भारतीय तरुणांशी एक कॅब ड्रायव्हर अपमानास्पद वागत शिवीगाळ करीत असल्याचे दिसतेय; ज्याचा एक व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होत आहे.
एक कन्नड यूट्युबरने यूट्युबवर थायलंडमध्ये व्लॉगिग करतानाच एक व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यामध्ये थायलंडमधील एक कॅब ड्रायव्हर त्याच्यासह त्याच्या मित्रांना शिवीगाळ करून, भारताविषयी संतापजनक विधान करीत असल्याचे दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो पाहून अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मालदीवप्रमाणे आता थायलंडलाही धडा शिकविण्याची मागणी केली आहे.
थायलंड कॅबचालकाने भारतीयांना केली शिवीगाळ
व्हिडीओमध्ये थायलंडमधील एक कॅब ड्रायव्हर भारतीयांना “कंजूस” म्हणत असल्याचे दिसून येते. तो भारतीय यूट्युबरला आणि त्याच्या मित्रांना मधले बोट दाखवीत भारतीयांविषयी अपमानास्पद विधान करीत शिवीगाळ करतोय. यावेळी भारतीय यूट्युबर आणि त्याचे मित्र त्याला हे अतिशय चुकीच्या पद्धतीचे वागणे असून भारताची माफी मागण्यास सांगतात. पण, हा कॅब ड्रायव्हर कोणालाही न जुमानता, हॉटेलमध्ये पोहोचेपर्यंत वाद घालणे सुरूच ठेवतो. अखेर बराच वेळ वाद घातल्यानंतर हॉटेलमध्ये पोहोचताना कॅब ड्रायव्हर सॉरी बोलून तेथून निघून जातो.
कॅब ड्रायव्हरने मागितली माफी
कॅबमधून खाली उतरल्यानंतर भारतीय पर्यटकांनी त्याला भारताविषयी तो जे काही बोलला, त्याबद्दल माफी मागण्यास सांगितले. तसेच आमच्याकडे तुझे फुटेज आहेत. आम्ही पोलिसांना बोलावू, असेही सांगितले. त्यानंतर कारवाईच्या भीतीने घाबरून त्याने माफी मागितली. यावेळी त्या कन्नड यूट्युबरने कॅब ड्रायव्हरला “थायलंडमध्ये भारतीयांना परवानगी नाही” असा बोर्ड लावण्यास सांगितले.
कन्नड यूट्युबरने त्याच्या यूट्युब चॅनेलवर या घटनेचा व्हिडीओ पोस्ट करीत संपूर्ण घटना स्पष्ट करून सांगितली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, युजर्स कॅब ड्रायव्हरला भारतीयांना शिवीगाळ केल्याबद्दल फटकारत आहेत. त्यावर अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मालदीवप्रमाणे थायलंडलाही धडा शिकविण्याची विनंती केली. तसेच परदेशांत भारतीयांना मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीविषयीही अनेकांनी आपले मत व्यक्त केलेय.