मलेशिया आणि दक्षिण थायलंडमधील मान्सून पावसामुळे विनाशकारी पूर स्थिती निर्माण झाली असून, हजारो लोक विस्थापित झाले आहेत आणि अनेकांचा जीव गेला आहे. थायलंडच्या आपत्ती प्रतिबंध व निवारण विभागानुसार, पूर-संबंधित घटनांमध्ये किमान २५ जणांचा मृत्यू झाला असून ३ लाखांहून अधिक कुटुंबे गंभीरपणे प्रभावित झाली आहेत.
दरम्यान, बचाव आणि स्थलांतराच्या दुःखद दृश्यांमध्ये एका व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. या व्हिडिओमध्ये पूराच्या पाण्यात महाकाय अजगर तरंगताना दिसतो. धक्कादायक गोष्ट म्हणजे या अजगराने कुत्र्याला गिळले आहे.
१ डिसेंबर रोजी पट्टानी प्रांतामध्ये हा व्हिडिओ चित्रीत करण्यात आला असून, त्यात महाकाय अजगर पोट फुगलेल्या अवस्थेत जलमय रस्त्यावर तरंगताना दिसतो. @AMAZINGNATURE या X (ट्विटर) हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “दक्षिण थायलंडमध्ये पूराच्या पाण्यात हा महाकाय अजगर तरंगताना दिसला.”
व्हिडिओला सुमारे २० लाख लोकांनी पाहीले असून यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “थायलंड माझ्या बकेट लिस्टमधून काढून टाकले.” दुसर्याने म्हटले, “हा अजगर पाण्यावर उलटा तरंगतोय, म्हणजे तो मृत असावा किंवा गंभीर त्रासात असावा.”
तिसर्या एका वापरकर्त्याने लिहिले, “त्याचं पोट मानवी आकाराचं दिसतंय, भीतीदायक आहे!”
यूसीए न्यूज या स्वतंत्र कॅथोलिक न्यूज स्रोतानुसार, पट्टानी, नराथिवात, सोंगख्ला, नखोन सी थम्मरात आणि फटलुंग या पाच दक्षिणेकडील प्रांतांना या पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. ३३,००० हून अधिक लोकांना आपली घरे सोडावी लागली असून, थायलंडच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
खनिज संसाधन विभागाने ५ डिसेंबरपर्यंत दक्षिण थायलंडमध्ये भूस्खलन आणि वेगाने येणाऱ्या पुराचा इशारा दिला असून, बचावकार्य सुरू आहे.