ऑफिसला जाताना वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या ठाणेकरांसाठी आता महापालिकेने अभिनव उपक्रम सुरु केला आहे. ठाणे महापालिकेने शहरात ५० ठिकाणी सायकल स्टेशन उभी करण्याचा निर्णय घेतला असून प्रत्येक स्टेशनवर १० सायकली ठेवण्यात येणार आहे. या सायकलींवरुन ठाणेकरांना आता ऑफिसला जाता येईल.

ठाणे शहराचा झपाट्याने विकास होत असतानाच शहरात वाहतूक कोंडीची समस्याही भीषण रुप धारण करत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. ठाणे महापालिकेने जपानहून १०० सायकली मागविल्या आहेत. शहरातील वाहनांची गर्दी आणि प्रदूषण कमी व्हावे यासाठी महापालिकेने ग्रीन सायकल उपक्रम सुरु केला आहे. येत्या काळात महापालिकेच्या वतीने ५० सायकल स्टँड तयार करण्यात येणार असून प्रत्येक स्टॅंडमध्ये १० सायकली ठेवण्यात येतील. सध्या तीन सायकल स्टॅंड सुरु करण्यात आले असून बाकी स्टॅंड महिन्याच्या अखेरपर्यंत सुरु होतील. या सायकली अत्यल्प दरात भाडेतत्त्वावर नागरिकांना घेता येतील.

नागरिक आपल्या घराजवळ असणाऱ्या स्टॅंडवरुन सायकल घेऊन ऑफिसला जाऊ शकतात. संध्याकाळी पुन्हा ही सायकल स्टॅंडवर आणून लावायची आहे. ज्यांना या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी महापालिकेमध्ये नोंदणी केल्यानंतर त्यांना स्मार्ट कार्ड देण्यात येईल. शहरातील महत्त्वाच्या बस थांब्यांजवळ आणि रेल्वे स्थानकाजवळ हे सायकल स्टॅंड सुरु करण्यात येणार असल्याचे महापालिने सांगितले. यासाठी भरावी लागणारी रक्कम ऑनलाईनही भरता येणार आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

कसे व्हाल सदस्य?

या उपक्रमात सभासद होण्यासाठी आधार कार्ड किंवा पासपोर्टची छायांकित प्रत आणि २५० रुपये भरावे लागतील. सभासद म्हणून नोंदणी झाल्यावर सायकलस्वाराला स्मार्ट कार्ड देण्यात येईल. या कार्डचा वापर करुन सायकलस्वार सायकल लॉक आणि अनलॉक करु शकतो. या सर्व सायकलींसाठी जीपीएस प्रणालीचा वापर करण्यात आल्याने त्या ट्रॅकही करता येतील.

Story img Loader