टिंडर हे युवक-युवतींमध्ये प्रसिद्ध असलेलं ॲप आहे. जोडीदार शोधण्यासाठी या ॲपचा वापर केला जातो. मात्र अलीकडे टिंडरवरून फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. ठाण्यामधील एका युवकाला टिंडरवर भेटलेल्या मैत्रीण आणि त्यानंतर जेवणासाठी गेलेल्या रेस्टॉरंटने गंडा घातला. सदर मैत्रिणीबरोबर एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यानंतर त्याठिकाणी ४४ हजार रुपयांचे बिल झाले. एक डेट युवकाला इतक्या महागात पडेल, असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली, मात्र बिलाच्या रकमेत फारसा बदल झाला नाही.
रेडिट या सोशल मिडिया साईटवर एका युजरने सदर घटनेतील बिलाचा फोटो पोस्ट केला आहे आणि टिंडरवरून डेटला जाताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. टिंडरवर फसवणूक केली जात असल्याचेही या युजरने सांगितले आहे.
“CBSE च्या नववीच्या पुस्तकात डेटिंग, रोमान्स अन्…”, Tinder म्हणालं, “आता पुढचा धडा…”
सदर बिलानुसार काय काय ऑर्डर देण्यात आली, त्याची माहिती मिळत आहे. रेस्टॉरंटमध्ये बसलेले असताना दोघांनी १८ जॅगरबॉम्ब्स, दोन रेड बुल्स, फ्रेंच फ्राइज, खारे शेंगदाने, चार चॉकलेट ट्रफल केक आणि स्पेशल मिक्स एवढ्याच पदार्थांची ऑर्डर देण्यात आली होती. या सर्व पदार्थांचे मिळून ४४,८२९ रुपयांचे बिल देण्यात आले. एवढे प्रचंड बिल पाहिल्यानंतर डेटवर गेलेला युवक हादरूनच गेला. त्याने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर केवळ चार हजार रुपये कमी करण्यात आले. त्यानंतरही त्याला ४० हजार अदा करावे लागणार आहेत.
२ जुलै रोजी रेडिटवर ही पोस्ट शेअर करण्यात आली. त्यानंतर सोशल मीडियावर हे बिल व्हायरल होत आहे. अनेक लोक यावर आपलं मत व्यक्त करत आहेत.
टिंडर डेटिंग ॲपवरून ओळख.. अभियंता तरुणीवर अत्याचार, मारहाण करून डोळा फोडला
एका युजरने म्हटले की, या बिलाची रक्कम ही माझ्या महिन्याच्या पगाराएवढी आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, या प्रकरणात पीडित युवकाने पोलिसात तक्रार दाखल केली पाहिजे. कारण नुकतेच दिल्लीतील युपीएससीचा अभ्यास करणाऱ्या एका युवकाने अशाच प्रकारचे रॅकेट उध्वस्त केले होते. या रॅकेटमध्ये हॉटेल चालक, वेटर आणि टिंडरवरील मुलगी असे सर्व लोक सामील होते. मुंबई, हैदराबाद आणि इतर मेट्रो शहरांमध्ये अशाचप्रकारचा घोटाळा केला जात आहे. त्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल करून पैसे परत मिळविले जाऊ शकतात.
आणखी एका युजरने म्हटले की, बिलामध्ये १८ जॅगरबॉम्ब्स ऑर्डर केल्याचे दिसत आहे. पण सीसीटीव्ही तपासून खरंच इतके जॅगरबॉम्ब्स ऑर्डर केले का? याची माहिती मिळविता येऊ शकते, कदाचित सीसीटीव्हीमधून हे स्पष्ट होईल.