सध्या अमेरिकेत ‘थँक्सगिव्हिंग’ची जोरदार तयारी सुरू आहे. या तयारीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी देखील खारीचा वाटा उचलला आहे. ‘थँक्सगिव्हिंग डे’निमित्तानं ‘शिकागो फूड बँक’ गरीब, बेघर लोकांसाठी अन्नाची पाकिटं तयार करत होती. या पाकिटात पदार्थ, फळं भरण्याचं काम स्वत: ओबामा यांनी देखील केलं.

जाणून घ्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केल्या जाणाऱ्या ‘थँक्सगिव्हिंग’बद्दल रंजक गोष्टी

थँक्सगिव्हिंगच्या दिवशी अमेरिकेत कृतज्ञता व्यक्त करत अनेकजण एकमेकांना भेटी, जीवनावश्यक वस्तू देतात. काहीजण जंगी मेजवानीचं आयोजन करतात. अमेरिकन लोकांचा सर्वात आवडता सण म्हणून थँक्सगिव्हिंग ओळखला जातो. हा दिवस गरिब बेघर लोकांसाठीही खास ठरावा यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था कार्य करत आहेत. ओबामा यांनी अशाच एका फूड बँकला भेट देत त्यांना कामात मदत केली.

अगदी साध्या वेषात आलेल्या ओबामांना पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ओबामा यांनी स्वत: पदार्थ पाकिटात भरायला संस्थेच्या कार्यकर्त्यांना मदत केली. या कार्यात शिकागो फूड बँकेला बराक ओबामांच्या स्वयंसेवी संस्थेनेही मदत पुरवली. ‘थँक्सगिव्हिंग’ सण हा प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणणारा सण आहे तेव्हा प्रत्येकांनी एकमेकांना मदत केली पाहिजे असं आवाहनही त्यांनी लोकांना केलं.
दरम्यान माजी राष्ट्राध्यक्ष स्वत: मदतीसाठी हातभार लावत आहेत हे पाहून अनेकजण मदतीसाठी स्वत:हून पुढे आले आहेत.