सोशल मीडियावर मुंबई एअरपोर्टचा एक फोटो सध्या चर्चेत आहे. या मागचं कारण वाचून तुम्ही थोडे हैराण होऊ शकतात. मुंबई एअरपोर्टचा हा फोटो आयर्लंडच्या ‘Lovin Dublin’ या एका न्यूज आणि लाइफस्टाइल वेबसाइटने सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो शेअर करताना त्यांनी डबलिनमध्ये सतत होत असलेल्या पावसाचा संदर्भ देत, ‘ एका तासाच्या पावसामुळे डबलिन एअरपोर्टची स्थिती” असं म्हटलं. त्यानंतर हा फोटो डबलिन एअरपोर्टच्या नावाने व्हायरल होण्यास सुरूवात झाली.

फोटो व्हायरल झाल्यानंतर आता डबलिन एअरपोर्टने आपल्या ट्विटर हँडलवरुन या फोटोचा स्क्रिनशॉट शेअर केला असून हा डबलिन नव्हे तर मुंबई एअरपोर्टचा फोटो आहे असं म्हटलंय. फोटोमध्ये एअरपोर्टवर एक विमान उभं असल्याचं दिसत आहे. पण हा फोटो नक्की कुठलाय हे समजत नाही. मात्र, विमानावरील पिवळा आणि निळ्या रंगावरुन हे विमान भारताच्या जेट एअरवेज कंपनीचं असल्याचं स्पष्ट होतंय. “मित्रांनो हे डबलिन एअरपोर्ट नव्हे तर भारतातील मुंबई एअरपोर्ट आहे. तिथे उभं असलेलं जेट एअरवेजचं विमान त्याचा पुरावा आहे. तुमचा गोंधळ आम्ही समजू शकतो…कारण आयर्लंडप्रमाणेच होणारा मुसळधार पाऊस आणि दुसरं म्हणजे… बरेच दिवस झाल्यामुळे आम्ही कसे दिसतो याचा कदाचित तुम्हाला विसर पडला असेल…”,अशा आशयाचं ट्विट केलं. हे ट्विट करताना डबलिन एअरपोर्टने जेट एअरवेजलाही टॅग केलं आहे.


डबलिन एअरपोर्टचं हे ट्विट आतापर्यंत 3 हजारांहून अधिक जणांनी लाइक केलंय. तर 100 पेक्षा जास्त कमेंट त्यावर आल्या आहेत. ‘Lovin Dublin ने हा फोटो कोणत्याही कॅप्शनशिवाय शेअर केला…हे चुकीचं आहे….यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो’, असं डबलिन एअरपोर्टने म्हटलं आहे.

Story img Loader