वाराणसीमधील डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींनी शुक्रवारी संवाद साधला. त्यावेळी करोनामुळे मरण पावलेल्यांबद्दल बोलताना मोदींचा कंठ दाटून आला. देशातील आणि वाराणसीमधील परिस्थितीबद्दल मोदी बोलत होते. याचवेळेस करोनामुळे आपल्या जवळच्या अनेक प्रिय व्यक्तींना प्राण गमावावा लागला आहे. करोनामुळे मरण पवालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करताना मोदींना रडू आलं. मात्र मोदींच्या या रडण्याची सर्वाधिक चर्चा सोशल नेटवर्किंगवर दिसून आली. मोदींचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल नेटवर्किंगवर ऑस्कर्स हा हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला. मोदी डॉक्टरांशी संवाद साधताना ज्याप्रकारे रडले तो सर्वोत्तम अभिनय होता यासाठी त्यांना ऑस्कर्स पुरस्कार द्या अशी टीका अनेकांनी केल्यामुळे OSCAR हा शब्द ट्रेण्डमध्ये आहे. शुक्रवारपासून सुरु असणाऱ्या या ट्रेण्डमध्ये बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपालवर्मा यांनीही ट्विट केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राम गोपाल वर्मा यांनी ऑस्कर्स पुरस्कार सोहळ्यातील काही क्षणचित्रे एडीट करुन तयार केलेला छोटा व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला पुरस्कार देणारी महिला सर्वोत्तम अभिनेता पुरस्कारासाठी नामांकन आहेत. असं म्हणते आणि त्यानंतर मोदींच्या संवादामधील रडण्याची क्लिप व्हिडीओत लावण्यात आली आहे. मोदी बोलत असतानाच बॅकग्राऊण्डला कल हो ना हो चित्रपटातील हर घडी बदल रही है… गाण्याचं म्युझिक वापरण्यात आलं आहे. व्हिडीओमध्ये काही पत्रकार टाळ्या वाजवतानाही दाखवण्यात आलेत. त्यानंतर ऑस्कर गोज टू म्हणत मोदींच्या नावाची घोषणा केली जाते. व्हिडीओच्या शेवटी मोदींचा चेहरा मॉर्फ करुन त्यांच्या हाती ऑस्कर पुरस्काराची बाहुली दाखवण्यात आलीय. त्याप्रमाणे नरेंद्र मोदी या शब्दांचा वापर करुन बनवण्यात आलेलं इंग्रजी गाण्याच्या चालीवरील गाणंही व्हिडीओच्या शेवटी वापरलं आहे. हा आतापर्यंतचा सर्वोत्तम ऑस्कर पुरस्कार असल्याची कॅप्शन त्यांनी या व्हिडीओसाठी लिहिलीय.

राम गोपाल वर्मा यांनी अशाप्रकारे मोदींवर टीका करण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीय. काही दिवसांपूर्वी वर्मा यांनी मोदींचा वाढलेल्या दाढीतील फोटो ट्विट केला होता. “ते (मोदी) अक्षरशः हिमालयात डोंगरांभोवती फिरणारे बाबा वाटतायत ज्यांना देशातील ऑक्सिजन, बेड्सच्या समस्येबद्दल काहीच कल्पना नाहीय, अशा दिसणाऱ्या पंतप्रधानांची मला प्रामाणिकपणे लाज वाटत आहे. तर सर कमीत कमी दाढी तरी करा,” अशा शब्दांमध्ये राम गोपाल वर्मांनी या फोटोला कॅप्शन दिलेली. १ मे रोजी केलेल्या ट्विटमध्ये वर्मा यांनी, “सर नरेंद्र मोदीजी, मी एक सभ्य हॉरर चित्रपट निर्माता आहे. पण माझी तुम्हाला विनंती आहे की मला तुमच्या आगामी “तिसरी लाट” या हॉरर चित्रपटात स्पॉट बॉयचं काम द्या. मी मृतदेह मोजण्याच्या विभागातही काम करु शकतो. कारण, तुमच्याइतकेच मलाही मृतदेह आवडतात पण कारणं वेगवेगळी आहे”, अशा  उपरोधिक शैलीत टीका केली होती. त्यापूर्वी त्यांनी, “करोना परिस्थिती योग्य प्रकारे न हाताळल्याबद्दल सर्व वृत्तवाहिन्या नरेंद्र मोदी यांना वगळून प्रत्येकाची मुलाखत कशी घेऊ शकतात?”, असा प्रश्न २६ एप्रिल रोजी केलेल्या ट्विटमध्ये उपस्थित केलेला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The best oscar ever ram gopal varma posted a video after pm modi cried on air scsg