दुचाकी किंवा कारच्या नंबर प्लेटवर आपलं आडनाव किंवा आवडत्या व्यक्तीचे नाव लिहिणे हे काही नवीन नाही. शिवाय हे वाहतुकीच्या नियमांचे स्पष्ट उल्लंघन असले तरीही अनेक लोक हा नियम सर्रासपणे मोडताना आपणाला दिसतात. तर काहीजण आपल्या नेत्यांचे फोटो किंवा नाव नंबर प्लेटवर दादा, काका, साहेब असे वेगवेगळे शब्द लिहित असतात. सध्या अशाच एका कार्यकर्त्याला आपल्या नेत्याचं नावं नंबर प्लेटवर लिहिणं चांगलच महागात पडलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसी ट्रॅफिक पोलिसांनी एका तरुणाला तब्बल ६ हजार रुपयांचा दंड केला आहे. कारण त्याने आपल्या गाडीच्या नंबर प्लेटवर ‘योगी सेवक’ असं लिहिलं होतं. तर या तरुणाला हे लिहिणं चांगलच महागात पडल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या या नंबर प्लेटचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हेही वाचा- Viral Photo: कस्टम विभागाने विमानतळावर जप्त केली सोन्याची काळी अंडी; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
नेमकं काय घडलं ?
वाराणसीच्या भोजबीर चौकात वाहतूक पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू होती. या दरम्यान, एक तरुण दुचाकीवरून आला असता पोलिसांनी त्याची तपासणी केली. तरुणाने आपल्या दुचाकीची कागदपत्रे दाखवण्यासही सांगितले. तरुणाने दाखवलेली कागदपत्रे बरोबर होती, तरीही त्याला ६ हजार रुपयांचे चलान कापावे लागले आहे. त्याचं कारण म्हणजे त्याने नंबर प्लेटशी संबंधित वाहतुकीचे सर्व नियम मोडले होते. या तरुणाने दुचाकीच्या नंबर प्लेटच्या मध्यभागी ‘योगी सेवक’ असे लिहिले होते. तर त्याची नंबर प्लेटही भगव्या रंगाची होती. अशा विचित्र नंबर प्लेटमुळे या तरुणाला दंड भरावा लागला.
हेही पाहा- आनंद महिंद्रांनी घेतली शेतकऱ्याच्या ट्विटची दखल, उसाचा ट्रॅक्टर बाहेर काढतानाचा Video पाहून म्हणाले…
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कारवाई करण्यात आलेली बाईक अंकित दीक्षित नावाच्या व्यक्तीच्या नावावर नोंद केलेली आहे. या तरुणाने स्वत:ला हिंदुत्ववादी संघटनेचा अधिकारी असल्याचं सांगितलं. मात्र, पोलिसांनी वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी त्याला दंड ठोठावला. पोलिसांच्या या कृत्याचं अनेकांनी समर्थन केलं आहे. शिवाय नियम सर्वांसाठी सारखेच असल्याचंही नेटकरी म्हणत आहेत.