तामिळनाडूतील कांचीपुरम येथील एका आमदाराला बस चालवण्याची हौस चांगलीच महागात पडलं आहे. खरं तर अनेक लोकप्रतिनिधींना विविध कामांचे उद्घाटन करायला खूप आवडत हे आपणाला माहिती आहे. पण सध्या एका आमदाराने रस्त्याचे उद्घाटन केल्यानंतर थेट बस चालवण्याचं केलेलं धाडस भलतच महागात पडलं आहे. कारण या आमदारांनी बस चालवताना झालेल्या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तामिळनाडूतील कांचीपुरम येथील डीएमकेचे आमदार सीव्हीएमपी एझिलारासन यांनी बुधवारी त्यांच्या मतदारसंघातील एका नवीन बस मार्गाचे उद्घाटन केले. यावेळी आमदारांनी सरकारी बसला हिरवी झेंडा दाखवला आणि त्यांनी चक्क बस चालवायला घेतली. आमदारांनी बस चालवण्यापूर्वी बसची पूजाही केली. शिवाय आता चक्क आमदारसाहेबच बस चालवणार म्हटल्यावर कार्यकर्ते मागे कसे राहतील? त्यामुळे आमदार बसमध्ये चढताच त्यांच्या पक्षाचे अनेक कार्यकर्तेही बसमध्ये चढले आणि आमदारांनी काही अंतरावर बस चालवत नेलीसुद्धा. शिवाय आमदार चालवत असलेल्या बसवर माजी मुख्यमंत्री करुणानिधी, विद्यमान मुख्यमंत्री स्टॅलिन आणि क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांचे फोटो लावल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.
ही बस काही अंतरावर गेल्यानंतर आमदाराचे बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यात गेल्याचं व्हिडीओत दिसत आहे. बसवरील नियंत्रण सुटल्यानंतर बस सर्वात आधी रस्त्याच्या कडेला लावलेल्या पक्षाचे झेंडे चिरडत जाते आणि त्यानंतर थेट एका खोल खड्ड्यात अडकते ज्यामुळे ती एका बाजूला कलंडल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे बसच्या शेजारी एक विजेचा खांब असल्यामुळे उपस्थितांना तत्काळ द्रमुकचे कार्यकर्ते आणि बसमध्ये बसलेल्या इतर लोकांना बाहेर काढलं.
बस बाहेर काढण्यासाठी कार्यकर्त्यांची कसरत –
बस खड्ड्यात अडकल्यानंतर सर्वात आधी आमदारांना बसमधून उतरवण्यात आले. ते ड्रायव्हिंग सीटवरून हसत हसत खाली उतरल्याचं व्हिडीओत दिसत आहे. आमदारांनंतर बसमधील इतर लोकांनाही खाली उतरवण्यात आलं. त्यानंतर अनेकांनी बसला ढकलून खड्ड्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर बस तेथून हटवण्यात आली. या अपघातात बसच्या पुढील भागाचे नुकसान झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे आमदारांची बस चालवण्याची हौस सरकारला आणि खुद्द आमदारांनादेखील महागात पडल्याचं नेटकरी म्हणत आहेत.