मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो असं म्हणतात. त्यामुळेच अनेकजण नोकरी करता करता शिकतात. अशाच एका व्यक्तीने घरच्यांनी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी नोकरी करुन पैसे कमवतानाच शिकून चक्क डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. विशेष म्हणजे नोकरी आणि शिक्षण अशी सगळी कसरत करत या व्यक्तीला डॉक्टरीचे शिक्षण घेण्यासाठी चक्क २० वर्षांचा कालावधी लागला. डॉक्टरेट झाल्यानंतर त्याला दक्षिण चीन विद्यापिठामध्ये प्राध्यपक म्हणून नोकरी मिळाली आहे.
‘बिजिंग युथ डेली’ या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार ली मिंग असे या ४१ वर्षीय विद्यार्थ्याचे नाव आहे. मिंगचा जन्म गुईझोउ प्रांतातील दूर्गम भागातील मीटॅन या गावी झाला आहे. लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी असणाऱ्या मिंगला घरातील आर्थिक परिस्थितीमुळे वयाच्या १६ व्या वर्षीच शिक्षण सोडावे लागले. घरच्यांनी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी मिंगवर मिळेल ते काम करण्याची वेळ आली.
मी सर्वात आधी एका इमारतीच्या बांधकामासाठी मजूराचे काम केले. त्यानंतर मी पुन्हा माझ्या गावी आलो आणि बदकांची पोल्ट्री सुरु केली त्याबरोबरच तंबाखूची शेती करुन पैसे कमावले. जवळजवळ पाच वर्षे अशाप्रकारे पडेल ती कामे करुन मी कुटुंबावरील कर्जाची सर्व रक्कम परत केल्याचे मिंगने ‘बिजिंग युथ डेली’शी बोलताना सांगितले.
त्यानंतर १९९९ साली मिंग गुईझोउ विद्यापिठामध्ये सुरक्षारक्षक म्हणून कामाला लागला. तेथील वातावरण आणि तरुण विद्यार्थ्यांना शिकताना पाहून मिंगने पुन्हा एकदा अभ्यासाकडे वळण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षे त्याने तेथील नोकरी आणि शिक्षण अशा दोन्ही गोष्टी संभाळत पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर त्याने पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. मात्र या अभ्यासक्रमामुळे त्याला नोकरीसाठी फायदा होणार नव्हता. त्यामुळे त्याने हा अभ्यासक्रम पूर्ण करुन पुन्हा दुसऱ्या पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला.
या पदवी अभ्यासक्रमामध्ये वर्गामध्ये शिक्षण न घेता स्वत: अभ्यास करुन परिक्षा देणे अपेक्षित असते. इंग्रजीचे काहीच ज्ञान नसणाऱ्या मिंगला या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परिक्षा देणे चांगलेच अवघड गेले. ‘मी जवळजवळ आठ हजार इंग्रजी शब्द पाठ केले होते. तसेच अनेक इंग्रजी पुस्तके वाचून माझ्या शब्दांच्या ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुठे माझी इंग्रजीची भिती पळाली’, असं मिंग सांगतो. दोनवेळा तो प्रवेश परिक्षा नापास झाला. तिसऱ्यांदा प्रवेश परिक्षा देण्यासाठी गेला तेव्हा तो भयंकर आजारी होता. तापान फणफणत असतानाही त्याने तिसऱ्यांदा परिक्षा दिली आणि अखेर तो यात उत्तीर्ण झाला. त्याला २००७ साली गुईझोउ विद्यापिठामध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवल्याने तो काही मुलांना शिकवून थोडे अधिक पैसेही कमवत होता.
रोज सकाळी सात वाजता उठून ग्रांथालयात अभ्यासाला जायचं, मग नोकरीला जायचं, संध्याकाळी एक तास व्यायाम करायचा आणि त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत अभ्यास करायचा हा दिनक्रम मिंगने अनेक वर्षे सुरु ठेवला. आणि अखेर अनेकदा अपयशाला सामोरे गेल्यानंतर त्याने डॉक्टरेटचे शिक्षण पुर्ण केले आहे.
या यशाबद्दल बोलताना मिंग म्हणतो, ‘कोणला प्रोत्साहित करण्यासाठी मी कोणी बडी आसामी नाही. प्रत्येकाने आपले लक्ष्य ठरवून त्या दिशेने काम केल्यास ते नक्कीच साध्य करता येते. काहीजणांना अपयश येते आणि ते हा मार्ग सोडून देतात. मात्र योग्य पद्धतीने नियोजन केल्यास मजल दरमजल करत आपण आपल्या नियोजित ठिकाणी पोहचतो.’