देशामधील करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकावर टीका होतानाचे चित्र दिसत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेतील वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण आला असून रुग्णालयामध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधं उपलब्ध नाहीयत. तसेच लसींच्या तुटवड्याचाही प्रश्न निर्माण झालाय. याचमुद्द्यावरुन विरोधकांबरोबरच आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर टीका केली आहे. मात्र असं असतानाच दुसरीकडे भाजपा नेत्यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप मेहनत घेत असल्याचा उल्लेख असणारा लेख सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केला आहे. ‘द डेेली गार्डियन’ नावाच्या वेबसाईटवर मोदींच्या कामासंदर्भातील हा लेख प्रकाशित झाला असून भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी तो ट्विटरवरुन शेअर केलाय. मात्र भाजपा नेत्यांच्या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी या वेबसाईटची नोंदणी उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आल्याचे स्क्रीनशॉर्ट शेअर करत हा प्रचार थांबवा असं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “करोनाविरोधी लढ्यासाठी मोदी खूप मेहनत घेत आहेत”; सोशल मीडियावर भाजपा नेत्यांच्या पोस्टची ‘लाट’

कोणी आणि काय ट्विट केलं आहे?

मोदी सरकारमधील मंत्र्यांनी आणि भाजपाच्या अनेक नेत्यांनी या लेखामधील काही मुद्द्यांचा उल्लेख करत त्याची लिंक आपल्या ट्विटरवरुन शेअर केली आहे. यामधून भारत सध्या करोना संकटाचा सामना करत असताना कशाप्रकारे पंतप्रधान मोदी मेहनत घेत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपा नेत्यांनी केलाय. विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर न देता मोदी करोनासंदर्भातील काम करत असल्याचा दावा या लेखामधून करण्यात आला असून तो लेख भाजपाचे मंत्री सोशल नेटवर्किंगवर शेअर करताना दिसत आहे.

भाजपा आय़टी सेलचे प्रमुख असणाऱ्या अमित मालवीय यांनी हा लेख शेअर केला आहे. “कोणाच्या तरी मृत्यूची बातमी किंवा रिकव्हरी होत नसल्याच्या बातम्या दाखवल्या जातात. मात्र आपल्याला ठाऊक आहे का ८५ टक्क्यांहून अधिक लोक घरीच ठीक होत आहेत. केवळ ५ टक्के लोकांची परिस्थिती चिंताजनक असून त्यांची जास्त काळजी घेण्याची गरज आहे. मात्र देशात सध्या रिकव्हरी आणि डेथ रेटवर वाद सुरु आहे. या साथीसाठी कोणाला जबाबदार ठरवलं जावं यावर वाद सुरु आहे,” असं मालवीय यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी लेख शेअर करताना, “पंतप्रधान मोदी खूप मेहनत करत आहेत हे मी पाहिलं आहे. विरोधी पक्षांच्या दाव्यांमध्ये अडकू नका,” असं म्हटलं आहे.

गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनीही लेख शेअर करताना, “संकट आल्यानंतर शांततेमध्ये काम करणाऱ्या पंतप्रधानांपैकी हे एक आहेत. राजकीय आरोपांवर ते उत्तर देत बसत नाहीत कारण त्यांच्याकडे यासाऱ्यासाठी वेळ नाहीय. पंतप्रधान मोदींविरोधात विरोधकांची सुरु केलेल्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका,” असं म्हटलं आहे.

संसदीय कार्यमंत्री असणाऱ्या प्रल्हाद जोशी यांनाही हा लेख शेअर करताना अमित मालवीय आणि जी. किशन रेड्डी यांनी वापरलेल्या ओळीच पोस्ट केल्यात.

झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांनी या लेखाची लिंक शेअर केली आहे.

तसेच केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनाही हा लेख शेअर केलाय.

याचप्रमाणे राज्यमंत्री असणाऱ्या अनुराग ठाकुर यांनाही हा लेख शेअर केला आहे.

मध्य प्रदेशचे माजी मंत्री अर्चना चिटणीस यांनाही हा लेख शेअर केलाय.

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते गोपाल कृष्ण अग्रवाल यांनाही लेख शेअर केला असून करोनाविरुद्धच्या लढाईतील खरी माहिती जाणून घ्या असं म्हटलं आहे.

नेटकऱ्यांनी शोधून काढला साईटचा इतिहास

अनेक नेत्यांनी हे ट्विट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर या साईटसंदर्भात अनेक प्रश्न विचारले आहेत. भाजपा आय़टी सेलचे प्रमुख असणाऱ्या अमित मालविय यांच्या ट्विटवर काहींनी ही वेबसाईट दिसत का नाहीय असं विचारलं आहे. “हा द डेली गार्डीयन कुठला पेपर आहे? आमच्याकडे ओपन होत नाहीय,” असं एकाने वेबपेज ओपन होताना येणाऱ्या एररच्या स्क्रीनशॉर्टसहीत शेअर केलं आहे.

दुसऱ्या एकाने वेबसाईटच्या डोमने नेम रजिस्ट्रेशन आणि इतर माहितीच्या आधारे ‘द डेली गार्डीयन’ या वेबसाईटची नोंदणी उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आल्याचा स्क्रीनशॉर्ट शेअर केलाय. “मालवीयजी ही द डेली गार्जीयन साईट उत्तर प्रदेशमध्ये रजिस्टर आहे. तुम्ही सारे खूप नीच पक्षाचे सदस्य आहात. इथे लोक मरत आहेत आणि तुम्हाला तुमच्या प्रतिमेची चिंता आहे. ती सुद्धा तुम्ही खोट्या वेबसाईटच्या नावाने ठीक करण्याचा प्रयत्न करत आहात,” असं शुभम शर्मा नावाच्या व्यक्तीने हा उत्तर प्रदेशमधील नोंदणीचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत म्हटलं आहे.

द गार्डीयन हे ब्रिटनमधील अत्यंत नावाजलेलं वृत्तपत्र असून काही दिवसांपूर्वीच त्यांनी भारतातील करोना परिस्थितीवरुन पंतप्रधान मोदींवर टीका करणारा लेख प्रकाशित केला होता. याच वेबसाईटच्या नावावरुन द डेली गार्डीयन ही वेबसाईट तयार करण्यात आल्याचा दावा नेटकऱ्यांनी केलाय.

ट्रोलही करण्यात आलं…

अनेकांनी या लेखावरुन भाजपाच्या मंत्र्यांना ट्रोल केलं आहे. पाहुयात काही व्हायरल ट्विट्स

१) मोदी १८ तास काम करतात हे दाखवण्यासाठी मंत्र्यांना १८ तास तास काम करावं लागत आहे, असा टोला एकीने लागवलाय

२) वेबसाईट पाहतो तेव्हा

३) जेव्हा तुम्ही वेबसाईट ओपन करता

४) खरं आणि खोटं

५) लोकल वेबसाईट

६) मोदींनी प्रतिमेला प्राधान्य दिलं

काय आहे लेखामध्ये?

हा लेख भाजपाचे प्रसारमाध्यम समन्वयक असणाऱ्या सुदेश वर्मा यांनी लिहिला आहे. सुदेश हे वृत्तवाहिन्यांवरील चर्चा सत्रांमध्ये पक्षाची बाजू मांडताना अनेकदा दिसतात. सुदेश यांनी पंतप्रधान मोदींवर, ‘नरेंद्र मोदीः द गेम चेंजर’ हे पुस्तकही लिहिलं आहे. सुदेश यांनी लिहिलेल्या या लेखामध्ये, “पंतप्रधान मोदींचे विरोधक या साथीसाठी त्यांना जबाबदार ठरवत आहेत. निवडणुकीच्या प्रचारसभा करण्यासाठी त्यांनी परवानगी का दिली असा प्रश्न ते विचारत आहे. कुंभ मेळा का आयोजित करु दिला असंही ते विचारत आहेत. लॉकडाउन का लावला नाही असा विरोधकांचा प्रश्न आहे. मात्र जेव्हा राज्यांचे मुख्यमंत्री राजकारण करत होते तेव्हा पंतप्रधान मोदी काम करत होते,” असं म्हटलं आहे.

“दुसरी लाट एवढी भयानक असेल याचा कोणाला अंदाज नव्हता, तर यासाठी मोदींना जबाबदार ठरवणं योग्य आहे का?, सर्वोच्च न्यायालयाने ३० एप्रिल रोजी ७० वर्षांमध्ये देशात पुरेशी आरोग्य व्यवस्था उभारण्यात आली नाही, असं म्हटलं होतं. त्यामुळेच परिस्थिती एवढी गंभीर झालीय,” असा दावा सुदेश यांनी केलाय. “२०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी देशात १४ नवीन एम्स रुग्णालये सुरु करण्याचं ठरवलं. देशभरामध्ये १५७ मेडिकल कॉलेज सुरु करण्याची परवानगी दिली. २०१४-१५ मध्ये २१५ खासगी आणि १८९ सरकारी मेडिकल कॉलेज होते. २०१९ मध्ये २७९ सरकारी आणि २६० खासगी कॉलेज झाली. २०१४ मध्ये देशात एमबीबीएसच्या ५० हजार जागा होत्या. सहा वर्षांमध्ये ३० हजार जागा वाढवण्यात आल्या.” असं या लेखात म्हटलं आहे.

केंद्र सरकारने यंदाच्या वर्षी चार वेळा राज्यांना दुसऱ्या लाटेसंदर्भात इशारा दिल्याचा उल्लेख या लेखात आहे. पहिल्यांदा जानेवारीमध्ये, नंतर २१ फेब्रुवारीला, २५ फेब्रुवारीला आणि २७ फेब्रुवारीला राज्यांना दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. या लाटेचा सामान करण्यासाठी उपाययोजना करण्याचा सल्लाही देण्यात आल्याचं यात म्हटलं होतं. एप्रिल आणि मदरम्यान पंतप्रधान मोदींनी २८ वेळा बैठका घेऊन करोनासंदर्भात चर्चा केली. लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली तेव्हा विरोधकांनी याला भाजपाची लस असं म्हणत त्याला विरोध केल्याचाही उल्लेख लेखात आहे.

या मोहीमेवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

ट्विटरवर पंतप्रधान मोदी काम करत असल्याचा प्रचार भाजपा नेत्याकंडून केला जात असतानाच शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सर्व नेत्यांनी केलेल्या ट्विटचे स्क्रीनशॉर्ट शेअर केले आहेत. “आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्ये आपल्याला प्रश्न विचारत असलं म्हणून काय झालं? आम्ही आमचा प्रचार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वेबसाईटसारखी दिसणारी साईट निर्माण करु,” असं म्हणत प्रियंका यांनी या मोहीमेबद्दल शंका उपस्थित केलीय.

दुसरीकडे कम्युनिस्ट पक्षाचे दीपांकर यांनी किरेन रिजिजू यांच्या ट्विटचा स्क्रीनशऑर्ट शेअर करत, “केवळ रिजिजू आहेत की संपूर्ण मंत्रीमंडळाने ‘आता मोदी खूप मेहनत करताना दिसत आहेत’ असं म्हणत कुठे क्लिक करावं यासंदर्भातील ट्विट केलं आहे? रोजच्या मनोरंजनासाठी आणि सकारात्मकतेसाठी द डेली गार्डियनवर विश्वास ठेवा,” असा टोला लगावला आहे.

सध्या या प्रचारामुळे सोशल नेटवर्कींगवर भाजपा समर्थक आणि विरोधक असे दोन गट पडल्याचं चित्र दिसत आहे.

Story img Loader