Guinness World Record Videos : खेळाच्या मैदानात अनेक खेळाडू कंबर कसतात. मोठ्या स्पर्धेत यशाचं उंच शिखर गाठण्यासाठी अपार मेहनत घेत असतात. पण एका तरुणाने पाय नसतानाही हातांच्या बळावर मैदानात घाम गाळला. ‘सर सलामत तो पगडी पचास’ असं म्हणतात आणि ते सत्यच आहे. कारण अमेरिकेच्या एका धावपटूने अपंग असतानाही विश्वविक्रमाला गवसणी घातली. तल्लख बुद्धीचा वापर करुन आपल्या दोन हातांनी मैदानात धावण्याची जिद्दच या खेळाडूने दाखवली आहे.
अवघ्या ४.७८ सेकंदांत २० मीटर अंतर पार करून या खेळाडूने चक्क गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा किताब जिंकला. २०२१ मध्ये क्लार्कने विश्वविक्रम केल्याचा व्हिडीओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा सुंदर व्हिडीओ पाहून लाखो लोकांना प्रेरणा मिळाली. या व्हिडीओनं सोशल मीडियावर नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. क्लार्कने केलेल्या या चमकदारी कामगिरीबद्दल इंटरनेटवर अभिनंदनाचा वर्षावही होताना दिसत आहे.
इथे पाहा व्हिडीओ
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने त्यांच्या ट्वीटर हॅंडलवर हा व्हिडीओ शेअर करुन एक सुंदर कॅप्शनही दिलं आहे. झिऑन क्लार्क, “सर्वात वेगवान माणूस दोन हातांवर…”, असं कॅप्शमध्ये म्हटलं आहे. एका शारीरिक समस्येमुळं (Caudal Regressive Syndrome)क्लार्कचा जन्म पायांशिवाय झाला. पण जन्मापासून तो जराही खचला नाही. मानसिकदृष्ट्या अतिशय भक्कम असणाऱ्या क्लार्कने २०२२ मध्येही दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले.
ऑक्टोबर २०२२ मध्ये त्याने बॉक्स जम्पमध्ये एक विक्रम केला. लॉस एंजेलीस येथील व्यायामशाळेत तीन मिनिटात सर्वात जास्त डायमंड पुशअप्स मारून त्याने दुसऱ्या विश्वविक्रमाला गवसणी घातली. तसेच क्लार्कच्या नावावर अन्य विक्रमही नोंदवण्यात आले आहेत. ४० पाऊंडच्या वजनासोबत एका मिनिटात सर्वात जास्त पॅरेलल बार डीप्स मारण्याचा विक्रमही त्याने केला आहे. ४० किलो वजन पाठी घेऊन ५ मीटर दोरावर चढण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. या दोन्ही स्पर्था अतिशय कठीण स्वरुपाच्या असतानाही क्लार्कने विक्रम करुन यशाचं उंच शिखर गाठलं.