एखाद्या देशाचा राजा नोकरी करतो असं तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवाल का? खरंतर राजाचा थाटमाट खूपच मोठा असतो. त्याच्या दिमतीला हजारो नोकर चाकर असतात. आलिशान महाल, श्रीमंती, वैभव सारं त्याच्या पायाशी लोळण घालत असतं. तेव्हा एखादा राजा नोकरी का बरं करेल? पण सारेच राजा काही ऐशोआरामात आणि श्रीमंतीत आयुष्य व्यतीत करणारे नसतात. काहींना यापलिकडे जाऊन एक वेगळं आयुष्य जगावंसं वाटतं. आणि असंच आयुष्य गेल्या वीस वर्षांपासून जगत होते डच राजा विल्येम अलेक्झांडर King Willem-Alexander. काही महिन्यांपूर्वी एका इंग्रजी मासिकाला त्यांनी मुलाखत दिली. त्यात त्यांनी एक गौप्यस्फोट करून सगळ्यांना धक्का दिला.

राजे अलेक्झांडर गेल्या वीस वर्षांपासून केएलएम रॉयल एअरलाइन्समध्ये सहाय्यक वैमानिक म्हणून काम करत होते. विशेष म्हणजे विमानाने प्रवास करणाऱ्या एकाही प्रवाशाला ही गोष्ट लक्षात आली नव्हती. वैमानिकाच्या गणवेशात राजे विमानतळावर असायचे पण अनेकांना त्यांना ओळखता आलं नाही. विमान चालवणं हा विल्येम यांचा छंद आहे आणि तोच जोपासण्यासाठी त्यांनी वैमानिकाची नोकरी स्वीकारली. आपल्या जबाबदारीतून वेळ काढत महिन्यातून दोन वेळा ते सहायक वैमानिक म्हणून काम करायचे.

वाचा : सौदी राजांच्या फक्त सहलीचा खर्च ऐकून तुम्ही चक्रावून जाल!

वैमानिक म्हणून काम करण्याचा अनुभव हा खूपच चांगला होता. फार क्वचित लोकांना राजा विमान चालवत असल्याची माहिती होती. ते पाहून त्यांना खूपच आश्चर्य वाटायचं. ‘मी राजा आहे त्यामुळे कामाचा व्यापदेखील तितकाच मोठा आहे. खूप मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. त्यामुळे लोकांसाठी काय करता येईल याबद्दल सतत विचार डोक्यात सुरू असतात. वैयक्तिक आयुष्यात देखील अनेक अडीअडचणींना समोरं जावं लागतं. पण, वैमानिकाची नोकरी करताना विचारातून मी मुक्त असायचो. एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करता यायचं. त्यामुळे ते काम खूप सुंदर होतं’ अशी प्रतिक्रिया त्यांनी मुलाखतीत दिली. सध्या राजा बोइंग ७३७ विमान उडवण्याचं प्रशिक्षण घेत आहेत.

Story img Loader