दरवर्षी पाऊस सुरु झाला की पुण्यात सर्वांचे लक्ष असते ते भिडे पूलाकडे कारण भिडे पूल पाण्याखाली गेल्याशिवाय पुणेकरांना चांगला पाऊस झाला असे वाटत नाही. यंदा पावसाळा सुरु झाल्यापासून सर्वजण भिडे पूल पाण्याखाली केव्हा जाईल याची वाट पाहत होते दरम्यान पुणेकरांची प्रतिक्षा संपली आहे कारण प्रसिद्ध भिडे पूल अखेर पाण्याखाली गेला आहे.

महाराष्ट्रात काल रात्रीपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई-पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने धुमाकुळ घातला आहे. ज्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहे, रेल्वे आणि रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पुणे, मुंबईतील काही ठिकाणी शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा – Video : “भिडे पूल पाण्याखाली गेल्याशिवाय पुणेकरांचा पावसाळा सुरु होत नाही”; खडकवासल्याचे दरवाजे उघडले; नदीपात्राचा रस्ता बंद

पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला पावसाने झोडपून काढले आहे. धरण परिसरात १०० मिलिमीटर आणि घाटमाथ्यावर २०० मिलिमीटरपेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात सकाळी सहा वाजल्यापासून ३५५७४ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

हेही वाचा – पाय पसरून, मोबाईल बघत आरामात लोळतेय ‘ही’ व्यक्ती; दिल्ली मेट्रोतील नवा Video Viral

भिडे पूल, गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर, शितळा देवी मंदिर डेक्कन, संगम पूल पुलासमोरील वस्ती, जयंतराव टिळक पूल आणि होळकर पूल परिसर या ठिकाणी जाण्यास नागरिकांना प्रतिबंध करण्यात आला आहे, असे खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून कळवण्यात आले आहे.

पुण्यात पाण्याची पातळी वाढल्याने २०० अग्निशमन दलाचे जवान तैनात केले आहेत. १६० जणांची सुटका करण्यात आली आहे. पुण्यात अनेक सिंहगड रोड, कल्याणीनगर, कात्रज हिंजवडी परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. नदीपात्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल भागात पाणी साचल्याने अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.