सध्याच्या डिजिटल काळात अनेक लोक इंटरनेटचा वापर करतात, लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेकांना इंटरनेटचा वापर केल्याशिवाय राहवत नाही. कोणी गेम खेळण्यासाठी तर कोणी महत्वाच्या कामासाठी तर कोणी केवळ मनोरंजनासाठी इंटरनेटचा वापर करतात. याच गोष्टीचा गैरफायदा घेत मागील काही काळापासून सायबर गुन्हेगारांनी लोकांच्या फसवणूकीसाठी इंटरनेटचा वापर वाढविला आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावरही लोकांची फसवणूक होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. शिवाय यासाठी गुन्हेगार किती खालच्या पातळीला जाऊ शकतात याची कल्पनाही कोणी करू शकत नाही.
मागील काही दिवसांपासून सायबर गुन्हेगार अनोळखी नंबरवरुन लोकांना व्हिडीओ कॉल करुन त्यांच्याशी अश्लील संभाषण करत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दुर्दैवाने काही लोक याला बळी पडतात आणि मग सायबर गुन्हेगार ब्लॅकमेल करायला सुरुवात करतात. लोकांना धमक्या देतात. शिवाय काही लोक हे गुन्हेगार मागतील तेवढे पैसेही देतात मात्र जेव्हा ते पैसे देण्यास नकार देतात तेव्हा पुन्हा ब्लॅकमेल करण्यास सुरुवात होते. त्यामुळे लोक इज्जत वाचवण्यासाठी सर्व काहीही करुन पैसे देतात आणि प्रसंगी टोकाचं पाऊलही उचलतात, तरीही या सायबर गुन्हेगारांचे पोट भरत नसल्याची उदाहरणं समोर येतात.
या आधीही अनेकांनी फेसबुकवर अशा पोस्ट केल्या आहेत ज्यामध्ये त्यांना अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल येतो आणि त्यांच्यासमोर एक मुलगी असते. जी नग्न होते आणि स्क्रीन रेकॉर्डिंग करते. त्यानंतर ती पैसे मागायला सुरुवात करते. पैसे द्यायला नकार देताच ती स्क्रीन रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देते. अशा परिस्थितीत लोक या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. सध्या अशाच एका प्रकरणात सहभागी असलेल्या एका व्यक्तीने ग्वाल्हेरचे डीएसपी संतोष पटेल यांच्याकडे मदत मागितली आहे. ज्याचा व्हिडिओडी डीएसपीने ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
डीएसपींनी फोन न उचलण्याचा सल्ला दिला
दरम्यान, DSP आणि पिडित व्यक्तीच्या संभाषणाचा व्हिडीओ डीएसपींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “तुम्हाला अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल आला तर तो उचलू नका. ते केवळ सामाजिकदृष्ट्या आदरणीय व्यक्तींनाच लक्ष्य करतात. मुली नग्न होतात आणि स्क्रीन रेकॉर्डिंग करतात. ती सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करतात. गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे भासवून धमक्या देतात. व्हिडिओ व्हायरल होण्याच्या भीतीने पैसे पाठवू नका.” यावेळी DSP शेजारी बसलेली त्याची फसवणूक कशी झाली याची माहिती देत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तर यावेळी पीडित व्यक्तीने सांगितलं की, सायबर गुन्हेगाराने मला आधी २-३ हजार रुपये मागितले ते मी दिल्यानंतर ५० हजारांची मागणी केली आणि धमकी दिल्याचंही तो यावेळी सांगत आहे. यावर डीएसपींनी त्यांना पैसे देऊ नका, असा सल्ला दिला. अशा धमक्यांना घाबरू नका. शिवाय या व्यक्तीने शूट झालेला व्हिडिओदेखील डीएसपींला दाखवत बदनामीच्या भीतीने मी त्यांना पैसे दिल्याचं सांगितलं.