लग्न म्हटलं की नवऱ्याची वरात नवरीच्या घरी अगदी थाटामाटात घेऊन जाण्यात येते. आजकाल खेळण्यातील सायकल, बैलगाडी किंवा घोडे यांच्यावरून नवऱ्याची वरात आणली जात आहे, असे अनेक व्हिडीओ तुम्ही आजवर पाहिले असतील. पण, आज सोशल मीडियावर अगदी शांततेत एक वरात घेऊन जाण्यात येत आहे. काय आहे या वरातीत खास चला पाहूयात…
आता डिजिटल युगात प्रत्येक गोष्ट डिजिटल करण्याकडे अनेक तरुण मंडळींचा कल वाढला आहे. त्यामुळे या तरुण मंडळींनी काही तरी हटके करण्याचं ठरवलं आहे. एका तरुणाचे लग्न असते आणि तो घोड्यावर स्वार झालेला असतो. पण, लग्नाची वरात वाजत-गाजत नेण्यासाठी इथे कोणताही डीजे किंवा बँड नसतो. तरीपण नवऱ्याची वरात घेऊन जाण्यासाठी जमलेले सर्व जण या वरातीचा आनंद घेताना दिसत आहेत. तुम्हीसुद्धा पाहा ही अनोखी वरात.
हेही वाचा…हॉटेलमध्ये मेन्यू कार्ड पाहण्यासाठी आईने केला ‘असा’ जुगाड! VIDEO पाहून तुम्हीदेखील पोट धरून हसाल…
व्हिडीओ नक्की बघा :
बॉलीवूडच्या ‘ए दिल है मुश्कील’ या चित्रपटात एका पार्टीत स्वतःची आवडती गाणी हेडफोनमध्ये लावून पार्टीचा आनंद लुटला जात होता. अगदी त्याचप्रमाणे ही लग्नाची वरात आहे. लग्नाच्या वरातीत सहभागी झालेल्या प्रत्येक जणांनी कानावर हेडफोन लावला आहे आणि प्रत्येक जण या हेडफोनमधून गाणी ऐकत वरातीत नाचताना दिसून येत आहे. आतापर्यंत तुम्ही बँजो, डीजेवर नाचत वरात काढलेली पाहिली असेल, पण हेडफोन लावून वरातीत माणसं नाचत आहेत, अशी अनोखी वरात आजवर कधीच पहिली नसेल.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @shefooodie या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. शिवांगी असे या युजरचे नाव आहे, जी एक डिजिटल क्रिएटर आहे. तसेच या युजरने व्हिडीओला ‘ए दिल है मुश्कील’ डीजे पार्टीत सहभागी होईन असे कधी वाटले नव्हते, अशी भावना व्यक्त करत तुम्हाला कधी अशा पार्टीचा (वरातीचा) भाग व्हायला आवडेल का? अशी मजेशीर कॅप्शन युजरने दिली आहे आणि सोशल मीडियावर या वरातीने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.