Viral Post :- तुमच्यातील अनेकजण चहाप्रेमी असतील. काही जणांच्या दिवसाची सुरुवातच गरमागरम चहाने होते. चहा पिताना अनेकजण कप बशी किंवा प्लास्टिकचे कुल्हड कप वापरताना दिसतात. कप आणि बशीची जशी जोडी आहे, तशीच काहीशी चहा आणि किटलीचीसुद्धा जोडी आहे. तुम्ही चहाच्या टपरीवर अनेकदा चहाची किटली पाहिली असेल. टपरीवर चहा बनवून झाल्यावर चहावाला ती किटलीमध्ये भरून ठेवतो आणि वेळोवेळी गरमागरम चहा त्याच्या ग्राहकांना देतो. बाजारातसुद्धा विविध प्रकारच्या चिनीमाती, मातीच्या, स्टील आणि काचेच्या अश्या अनेक प्रकारच्या चहाच्या किटली तुम्हीसुद्धा पहिल्या असतील. पण, तुम्हाला जगातील सगळ्यात महागडी चहाची किटली माहीत आहे का ? जी सोनं आणि हिऱ्याने सजलेली आहे.
तर आज चहाप्रेमींना एक खास चहाची किटली पाहायला मिळणार आहे, जी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (guinness world records) यांच्या ट्विटर अकाउंंवरून शेअर करण्यात आली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने जगातल्या सगळ्यात महागड्या चहाच्या किटलीची झलक दाखवली आहे. या चहाच्या किटलीवरून तुमची नजर हटणार नाही. ही चहाची किटली ब्रिटनमधील एन सेथिया फाऊंडेशनच्या मालकीची आहे. चहाच्या किटलीचे वर्णन करायचं झालं, तर ही किटली १८-कॅरेटच्या पिवळ्या सोन्यापासून बनविली गेली आहे. आणि याचा बाह्यभाग पूर्णतः हिऱ्यांनी सजलेला आहे; तर चहाच्या किटलीची कडा हस्तिदंतापासून बनवली गेली आहे. त्यासोबतच किटलीच्या मधोमध असलेला लाल रुबी चहाच्या किटलीची शोभा वाढवताना दिसत आहे आणि एकूणच या अद्भुत चहाच्या किटलीची किंमत तब्बल २४ कोटी रुपये आहे आणि ही जगातली सगळ्यात महाग चहाची किटली असल्याचं सांगण्यात येत आहे. एकदा तुम्हीसुद्धा पहा ही अद्भुत चहाची किटली.
हेही वाचा :- डेहराडूनमध्ये पावसाचे थैमान, डिफेन्स कॉलेजची इमारत काही क्षणात नदीत कोसळली, घटनेचा थरारक Video व्हायरल
नक्की बघा पोस्ट :-
ही अद्भुत चहाची किटली इटालियन ज्वेलर फुल्वियो स्कॅव्हिया यांनी बनवली आहे. “द इगोइस्ट” असं या चहाच्या किटलीचं नाव आहे. ज्याची किंमत तब्बल २४ कोटी रुपये सांगण्यात आली आहे. ‘जगातील सगळ्यात महाग चहाची किटली’ असे रेकॉर्ड या किटलीने सेट केलं आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या ट्विटर अकाउंटवरून चार दिवसांपूर्वी ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यांनी जगातल्या या महाग चहाच्या किटलीचे पोस्टमध्ये वर्णन केले आहे. आणि सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट प्रचंड प्रमाणात अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे आणि अनेकजण ही चहाची किटली बघून ती खरेदी करण्याची इच्छा कमेंटमध्ये व्यक्त करताना दिसत आहेत.