सध्याच्या टेक्नोसॅव्ही जमान्यात मोबाईल फोन ही मुलभूत मानवी गरज बनली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपल्या आजुबाजूला सहज नजर टाकली तरीही अनेकजण आपापल्या मोबाईल स्क्रीन्समध्ये डोके खुपसून बसलेले दिसतील. अनेकांच्या हातात मोबाईल हा सतत गोंद लावल्याप्रमाणे चिटकून असतो. त्यामुळे अनेकदा आपल्याला आजुबाजूच्या गोष्टींचा आणि भवतालाचा विसर पडतो. याउलट मागच्या पिढीतील लोक इतक्या प्रमाणात टेक्नॉलीजीच्या आहारी गेलेले दिसत नाही. त्यामुळेच की काय या पिढीला ‘जनरेशन नेक्स्ट’पेक्षा निरीक्षणाची किंवा एखादी गोष्ट न्याहाळण्याची सवय आपसूकच लागलेली असते. दोन पिढ्यांमधील हाच फरक अधोरेखित करणारे एक छायाचित्र सध्या इंटरनेटवर प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. हे छायाचित्र ब्रुकलिनच्या मॅसॅच्युऐटस येथील हॉलीवूड चित्रपटाच्या प्रिमिअरदरम्यानचे आहे. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या जॉनी डेप याच्या ‘ब्लॅक मास’ चित्रपटाच्या प्रिमिअरला ही गर्दी जमली होती. मात्र, सध्या हे छायाचित्र अचानकपणे व्हायरल झाले आहे. या छायाचित्रातील एक वृद्ध महिलेची कृती बरेच काही सांगून जाणारी आहे. एखादा क्षण मोबाईल कॅमेऱ्याने टिपण्यापेक्षा तो तुमच्या डोळ्यांमध्ये आयुष्यभरासाठी साठवा, असा संदेश नकळतपणे हे छायाचित्र देते. यावेळी या आजीबाईंच्या आजुबाजूची गर्दी समोरच्या स्टार्सची एक छबी टिपण्यासाठी जीवाचा आटापिटा करताना दिसत आहे. मात्र, या आजीबाई निवांतपणे आपल्या डोळ्यांनी समोरचे दृश्य डोळ्यांमध्ये साठवत आहेत. हे छायाचित्र बोस्टन ग्लोबचे छायाचित्रकार जॉन ब्लँडिंग यांनी टिपले असून ट्विटरवर ते प्रचंड लोकप्रिय ठरले होते. तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करणाऱ्या या छायाचित्राला ट्विटरवर या छायाचित्राला ७ हजार जणांनी रिट्विट केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा