मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक भक्त भगवान शंकराची मनोभावे पूजा करतात. इच्छा पूर्ण झाल्यानंतर भक्त महादेवाचे आभार व्यक्त करतात. श्रावण महिन्यात अनेक जण मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी भगवान शंकराची पूजा करतात. तुम्ही महादेवांच्या भक्तांच्या अशा अनेक कथा ऐकल्या असतील. पण सध्या शिव शंकराच्या एका आगळ्या वेगळ्या भक्ताची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्याचे कारण देखील तसेच आहे. या व्यक्तीने त्याची इच्छा पूर्ण व्हावी या आशेने भोलेनाथची भक्ती केली पण जेव्हा त्याची इच्छा पूर्ण झाली नाही तेव्हा मात्र त्याने असे काही केले की त्याची कल्पना देखील कोणी केली नसावी.
लग्नाचा नवस पूर्ण न झाल्यामुळे एका तरुणाने संतप्त होऊन कौशांबी जिल्ह्यातील महेवा घाट परिसराच्या मंदिरातील शिवलिंग पळवून नेले. पोलिसांनी आरोपीला अटक करून मंदिरातील शिवलिंगाचा जीर्णोद्धार केला. पोलीस अधिकारी अभिषेक कुमार यांनी बुधवारी सांगितले की,’ महेवा घाट पोलीस स्टेशन हद्दीतील कुम्हियावा गावातील रहिवासी छोटू (२७) याला स्थानिक मंदिरातून शिवलिंग चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून शिवलिंग जप्त करण्यात आले असून ते पुन्हा मंदिरात स्थापित करण्यात आले आहे.
हेही वाचा – ”प्राथमिक शिक्षक होणे सोपे नाही…” विद्यार्थ्यांबरोबर कसा जातो शिक्षकांचा एक दिवस? व्हायरल व्हिडीओ पाहाच!
त्यांनी सांगितले की, १ सप्टेंबर रोजी काही लोक मंदिरात पूजा करण्यासाठी आले असता तेथे शिवलिंग नव्हते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून २ सप्टेंबर रोजी छोटूला संशयाच्या आधारे अटक केली. चौकशीदरम्यान त्याच्या सांगितलेल्या ठिकाणाहून शिवलिंग जप्त करण्यात आले.
हेही वाचा – धक्कादायक! देशी बनावटीचा बॉम्ब तोंडात फुटल्याने हत्तिणीला झाली जखम; अखेर उपासमारीने झाला तिचा मृत्यू
कुमार यांच्या म्हणण्यानुसार, छोटूला त्याच्या एका नातेवाईकाच्या मुलीशी लग्न करायचे होते पण त्याचे कुटुंबीय सहमत नव्हते. यावर श्रावण महिन्यात भगवान शिवाच्या मंदिरात पूजा करताना छोटूने आपल्या इच्छेनुसार लग्न करणार असल्याची शपथ घेतली होती. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार छोटू हा दररोज सकाळ संध्याकाळ मंदिरातील शिवलिंगाची पूजा विधीपूर्वक करत असे. याप्रकरणी छोटूविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.”