व्हायरल व्हिडिओमुळं डॉली चहावालाचं नशीब पालटलं. चहा बनविण्याच्या हटके शैलीमुळं डॉली चहावालाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असत. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स भारत भेटीवर आल्यानंतर त्यांनाही डॉली चहावाल्याबरोबर व्हिडिओ तयार करण्याचा मोह आवरला नाही. या दोघांचा एकत्रित व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता डॉली चहावाला मायक्रोसॉफ्टचे प्रसिद्ध उत्पादन विंडोजच्या १२ व्या व्हर्जनचा ब्रँड अँबॅसेडर बनणार असल्याची बातमी पसरली. मात्र या बातमीचा स्त्रोत आता समोर आला आहे.
मायक्रोसॉफ्टच्या विंडोजचे १२ वे व्हर्जन काही दिवसांनी उपलब्ध होणार आहे. या व्हर्जनचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून डॉलीची निवड झाल्याची बातमी बिंदू टाइम्स या पॅरोडी अकाऊंटवरून दिली गेली. मात्र बिंदू टाइम्सने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर उपहासात्मक पोस्ट टाकली होती. त्यानंतर इन्स्टाग्रामवर अनेकांनी ही पोस्ट शेअर केली. बिंदू टाइम्सने ही उपहासात्मक पोस्ट लिहिताना एक चूक केली होती. त्यांनी कॅप्शनमध्ये यासंबंधीचा मजूकर टाकायचे विसरले. त्यामुळे ही बातमी खरी असल्याचा अनेकांचा गैरसमज झाला.
मोदींना पंतप्रधान करण्यासाठी स्वतःचे बोट छाटून देवीला केले अर्पण; कार्यकर्त्याचा अघोरी प्रकार
सोशल मीडियावर ही बातमी वेगाने पसरण्याचे आणि ती खरी वाटण्याचे कारण म्हणजे बिल गेट्स यांचा डॉलीबरोबरचा व्हिडिओ. भारतात आल्यानंतर ‘वन चाय प्लिज’ या नावाने बिल गेट्स यांनी डॉलीबरोबर एक रिल तयार केले होते. त्याआधी डॉली त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही चांगलाच प्रसिद्ध होता. ‘डॉली की टपरी नागपूर’ या हँडलवरून डॉली चहा बनविण्याच्या त्याच्या हटके स्टाईलचे व्हिडिओ पोस्ट करत असतो.
विशेष म्हणजे हा व्हिडिओ व्हायरल होईपर्यंत डॉली चहावाल्याला बिल गेट्स यांच्याबाबत काहीही माहिती नव्हती. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना डॉलीने सांगितले की, मला माहीत नव्हते ते कोण आहेत. मला सांगितले गेले की, त्यांना चहा बनवून द्यायचा आहे. ते परदेशी नागरिक आहेत, एवढेच मला माहीत होते. मी जेव्हा दुसऱ्या दिवशी नागपूरला परतलो, तेव्हा मला कळले की, मी कुणाला चहा दिला होता.
एकेदिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही चहा बनवून द्यायचा आहे, हे माझे स्वप्न असल्याचे डॉली चहावाल्याने सांगितले. आज नागपूरचा चहावाला म्हणून माझी ओळख आहे. भविष्यात मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही चहा पाजायचा आहे.