अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये एका ९ महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलाच्या मुलाच्या आईने कथितरित्या तिच्या फॉर्म्युला दुधात फेंटॅनाइल (एक प्रकारचे औषध) मिसळल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी सांगितले की, २६ जून रोजी एका घरात लहान मूल बेशुद्धावस्थेत सापडले. नासाऊ काउंटी शेरीफ बिल लीपरच्या म्हणण्यानुसार, डिप्टीने सीपीआरच्या साह्याने मुलाला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर त्याचा एका रुग्णालयात मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलाच्या १७ वर्षीय आईने सुरुवातीला तपास करणाऱ्या पोलिसांना सांगितले की, तिला आपल्या मुलाला काय झाले आहे याची कल्पना नव्हती, परंतु तपासादरम्यान अशी काही माहिती उघडकीस आली की जी समजल्यावर पोलिसांना धक्काच बसला.
दुधात मिसळलं १० लोकांचा जीव घेण्याची क्षमता असलेलं फेंटॅनाइल –
मृत चिमुकल्याच्या शरीराची तपासणी केली असता त्याच्या शरीरात १० जणांना मारण्याची क्षमता असणारे फेंटॅनाइल असल्याचे उघडकीस आले. मंगळवारी चौकशीदरम्यान, आईने कबूल केले की, ती खूप थकल्यामुळे तिला झोप आली होती, मात्र मूल खूप रडत असल्याने तिला झोपता येत नव्हतं. म्हणून तिने यावेळी मुलाला झोपण्यासाठी दुधात फेंटॅनाइल मिसळून ते मुलाला पाजले.
मुलाला झोपवण्यासाठी पाजलं औषध –
महिलेने कबूल केले की, तिने एका बाटलीमध्ये फॉर्म्युला आणि फेंटॅनाइलचे मिश्रण भरले (जे तिला कोकेन वाटलं), परंतु नंतर ते फेंटॅनाइल असल्याचे समोर आले. शिवाय ते फक्त कोकेन आहे आणि ते पिल्याने मूल झोपी जाईल असं वाटलं म्हणून आपण ते बाळाला पाजल्याचं महिलने सांगितलं. या प्रकरणासंदर्भात पत्रकार परिषद घेत असताना शेरीफने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “असं कोण करतं? कोणती आई हे करेल? हे सामान्य नाही. ही महिला नक्कीच आजारी आहे. एक आई तिच्या मुलाशी असे कसे करू शकते हे माझ्या कल्पनेच्या पलीकडचे आहे, कोणीही या भयानक प्राणघातक औषधामुळे आपला जीव गमावू नये, विशेषतः निष्पाप मुलांनी तरी नकोच”
प्रतिबंधित औषध बाळगल्याचा आरोप –
या घटनेतील महिलेच नाव जाहीर केलेले नाही, मात्र तिच्यावर खून आणि प्रतिबंधित औषध बाळगल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास नासाऊ काउंटी शेरीफ कार्यालय आणि फ्लोरिडा विभागाद्वारे केला जात आहे.