अॅपल कंपनीचे प्रॉडक्ट वापरण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शिवाय या कंपनीचे प्रॉडक्ट लोकांना आत्ताच आवडतात असं नाही, तर अनेक वर्षांपासून अॅपलच्या प्रॉडक्ट्सची लोकांना भुरळ आहे. हो कारण सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अॅपलचे प्रॉडक्ट लोक किती वर्षापासून वापरत आहेत हे दिसून येत आहे. आयफोन बनवणाऱ्या अॅपल कंपनीचे सीईओ टीम कुक सध्या भारत दौऱ्यवर आहेत. भारतातील पहिल्या अॅपल स्टोअरच्या उद्घाटनासाठी ते मुंबईत आले आहेत. Apple चे पहिले अधिकृत स्टोअर मुंबईतील Jio World Drive Mall येथे उघडण्यात आले आहे.
टीम कुक यांनी या स्टोअरचे उद्घाटन केले त्यावेळी त्यांना एक मोठं सरप्राईज मिळालं आहे. ते म्हणजे, एक व्यक्ती या स्टोअरच्या उद्घाटनाला येताना तब्बल ३२ वर्ष जुना Appleचा कॉम्प्युटर घेऊन आला होता. जो पाहून स्वत: कंपनीचे कुक यांना आश्चर्याचा धक्का बसला. शिवाय या उद्घाटन समारंभादरम्यान, टीम कुक हा कॉम्प्युटर पाहून थक्क झाल्याच्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अॅपलच्या ३२ वर्ष जुन्या कॉम्प्युटरसह स्टोअरच्या लॉन्च इव्हेंटमध्ये पोहोचतो, जो पाहून कंपनीचे सीईओ स्वतः आश्चर्यचकित होतात.
हेही पाहा- विराट अंकल ‘मी वामीकाला डेटवर घेऊन…आरसीबीच्या छोट्या चाहत्याची विराट कोहलीकडे अजब मागणी
नेमका कसा आहे हा ३२ जुना कॉम्प्युटर ?
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अॅपलचा जुना कॉम्प्युटर दिसत आहे त्याचं नाव मॅकिंटॉश क्लासिक (Macintosh Classic) असं आहे. याची निर्मिती कंपनीने १९९० ते १९९२ दरम्यान केली होती. म्हणजेच तो सुमारे ३२ वर्षे जुना कॉम्प्युटर आहे. महत्वाची बाब म्हणजे हा कॉम्प्युटर त्या व्यक्तीने आजही जपून ठेवला आहे. ते पाहून कंपनीच्या सीईओला देखील आश्चर्य वाटलं. या कॉम्प्युटरमध्ये ४० एमबीची हार्ड डिस्क आणि २ एमबी रॅम आहे. तर या कॉम्प्युटरची किंमत ९९९ डॉलर होती.
हेही पाहा- साप आहे की रश्शी! मिलनात गुंग सापांना तरुणीने दोन हातांनी धरले अन्…; थरारक Video एकदा पाहाच
व्हिडीओ का होतोय व्हायरल –
अॅपल स्टोअरच्या उद्घाटना दरम्यान सीईओ टिम कुक यांनी एका व्यक्तीच्या हातात एवढा जुना कॉम्प्युटर पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला, शिवाय त्यांनी तो कॉम्प्युटर घेऊन येणाऱ्या व्यक्तीचे जोरदार कौतुक केलं. या घटनेत टिम कुक यांना खूप आनंद झाल्याचंही दिसत आहे. तर हा क्षण नेटकऱ्यांना देखील चांगलाच भावल्याचं दिसत आहे. कारण सध्या सोशल मीडियावर अनेक नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “अॅपलवरील आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी हा व्यक्ती Macintosh बरोबर घेऊन आला.” तर आणखी एकाने, “व्वा! हे खूप विलक्षण आहे!” अशी कमेंट केली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांना देखील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात आवडल्याचं पाहायला मिळत आहे.