Viral Video : विमानातून पहिल्यांदा प्रवास करायचा म्हटल्यावर प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण होते; ती म्हणजे ; ‘इंग्रजी भाषेतून संवाद साधण्याची’. विमानतळावरील सुरक्षेपासून ते विमानत जाईपर्यंत सगळ्यांशी इंग्रजी भाषेत बोलायचं असतं याचं काही जणांना दडपण येतं. पण कधी विमानात विमानचालकानं प्रवाशांशी मराठी भाषेतून संवाद साधल्याचं तुम्ही कधी पाहिलं आहे का? पण आज सोशल मीडियावर काहीतरी खास बघायला मिळालं आहे; ज्यात एका विमानात, पायलट इंग्रजी भाषेऐवजी चक्क मराठी भाषेतून उदघोषणा करताना दिसून आली आहे.
व्हायरल व्हिडीओ स्पाईसजेट एअरलाइन्सचा (Spice jet flights) आहे. हे विमान पुणे ते गोवा असा प्रवास करणारं आहे. विमानाची सेवा डोमेस्टिक असो की इंटरनॅशनल विमानात नेहमी इंग्रजीतून उदघोषणा केली जात असते. मात्र, पुण्यातून गोव्याला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानातील सह विमानचालिका ‘संजना अमृते’ हिनं आधी प्रवाशांच्या स्वागताची सुरुवात इंग्रजी भाषेत केली; पण नंतर तिनं मराठी भाषेतूनही स्वत:ची व मुख्य पायलटची ओळख करून दिली. आणि प्रवाशांची मनं जिंकली.
व्हिडीओ नक्की बघा :
मराठी भाषेतून साधला संवाद :
नेहमीच विमानात इंग्रजी भाषेतून उदघोषणा केल्या जातात; पण या व्हिडीओत विमानातील सह विमानचालिका संजना अमृते हिनं चक्क मराठीतून उदघोषणा केली. सुरुवातीला इंग्रजी भाषेतून संवाद साधल्यानंतर सह विमानचालिका मराठीतून संवाद साधते आणि म्हणते : “बंधू आणि भगिनींनो तुमचे खूप स्वागत आहे. सह विमानचालिका, विमानाचे मुख्य पायलट यांची प्रवाशांना ओळख करून देते. आणि आवर्जून सांगते की, मुख्य विमानचालक चांगले कवी आहेत; त्यांना तुम्ही नक्की फॉलो करा. तसेच आपण हा प्रवास ४५ मिनिटांत पूर्ण करू असे ती प्रवाशांना सांगते. आणि सहविमानचालिका उदघोषणेचा शेवट ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ अशा शब्दांत करते. हे ऐकून टाळ्यांच्या गजरात विमानात बसलेले प्रवासी या व्हिडीओचा शेवट करतात.
सोशल मीडियावरील हा व्हिडीओ @ekikaransamiti यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘महाराष्ट्रातून उडणाऱ्या सर्व विमानांत प्रथम #मराठीत उदघोषणा झाल्या पाहिजेत’ अशी खास कॅप्शनदेखील या व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून अनेक जण, ‘हे खूप आधी व्हायला पाहिजे होतन’, ‘जय महाराष्ट्र’, ‘खूप छान’, ‘वा छान !’, ‘असा प्रवास नक्कीच आनंददायी होईल’ अशा शब्दांत अनेक जण विविध कमेंट करताना दिसून आले आहेत.