Reverse Waterfall in Naneghat : पृथ्वीवर अशी अनेक रहस्यमय ठिकाणे आहेत, जी माणसासाठी एखाद्या कोड्यापेक्षा कमी नाहीत. आपल्या देशातही अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यातीलच एक ठिकाण म्हणजे नाणेघाट. येथे असलेला धबधबा गुरुत्वाकर्षणाचे सगळे नियम धाब्यावर बसवत उलट दिशेने वाहतो. या धबधब्याचे पाणी खाली येण्याऐवजी वरच्या दिशेने जाते.
हा रहस्यमयी धबधबा पुण्यातील जुन्नर जवळील पश्चिम घाटात आहे. मुंबईपासून जवळपास तीन तासांच्या अंतरावर असलेला हा धबधबा आपल्या या वैशिष्ट्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात शेकडो पर्यटक या धबधब्याला भेट देण्यासाठी येतात. पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य बघण्यासारखे असते. यावेळी धबधब्याचे पाणी वर उडताना पाहणे हा एक वेगळाच अनुभव असतो.
महिला पत्रकाराने कॅमेरासमोरच तरुणाला लगावली कानाखाली, नेमकं असं काय घडलं? पाहा Viral Video
साधारणपणे आपण शाळेत शिकलो आहोत की वरून काहीही पडले तर ते खालीच येते. झऱ्यांचे पाणीही असेच आहे, पण नाणेघाटाचा धबधबा यासाठी अपवाद आहे. धबधब्याचे पाणी घाटाच्या उंचीवरून खाली येण्याऐवजी वर जाते. यासंबंधीचा एक व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत साडे तीन लाखांहून अधिक वेळा पाहिला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये धबधब्याचे पाणी वरून खाली येण्याऐवजी आकाशाच्या दिशेने जाताना आपण पाहू शकतो.
सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे की, जेव्हा वाऱ्याचा वेग गुरुत्वाकर्षणाच्या बलाएवढा किंवा त्याहून अधिक असतो, तेव्हा असे घडते. शास्त्रज्ञांनी या धबधब्याबद्दल सांगितले आहे की येथे वारा खूप वेगाने वाहतो, त्यामुळे वाऱ्याचा जोर गुरुत्वाकर्षणापेक्षा जास्त होतो आणि कोसळणाऱ्या धबधब्याचे पाणी वरच्या दिशेने उडते. पावसाळ्यात या दृश्याचा आनंद लुटण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर नाणेघाटात पोहोचतात.