Viral video: मुलीचं लग्न लावताना लेक घरातून जातेय यापेक्षा एक हक्काचा मुलगा आपल्या कुटुंबात प्रवेश करत आहे, ही भावना वधूच्या मात्या-पित्यांना जेव्हा येते तेव्हा एका उत्तम जावयाचा शोध लागलेला असतो असं समजावं. चांगला मुलगा, पती, भाऊ, मित्र अशा अनेक भूमिका निभावत असतानाच जावयाची भूमिकाही उत्तम वठवता येणं आवश्यक आहे. अशाच एका जावयचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये त्यानं जे केलंय ते पाहून तुम्हीही म्हणाल, प्रत्येक मुलीच्या बापाला असाच जावई मिळावा!
पूर्वीच्या काळी ‘जावई रुसणं’ हा जणू काही एक विधीच असायचा. म्हणजे लग्नाच्या मंडपात ऐन मुहूर्ताच्या वेळी नवरा मुलगा स्कूटर, फ्रीज, टीव्ही किंवा सोन्याचा एखादा दागिना अशा कुठल्याशा महागडया वस्तूसाठी अडून बसत असे. एवढंच काय तर अमूकच एक कोल्ड्रिंक प्यायला हवं म्हणूनही अडून बसलेल्या गोष्टी आपण ऐकल्या आहेत किंवा अनुभवल्या आहेत.आपल्या घरातल्या आजीकडून अशा अनेक लग्नांच्या कहाण्या ऐकायला मिळतील. खरं तर अडवणूक करण्याच्या या सा-या गोष्टी पूर्वनियोजित असत. तेव्हाचा काळ अगदीच वेगळा होता. शिक्षणानं आणि बदलत्या राहणीमानानं या गोष्टी इतिहासजमा केल्या आहेत.आजची मुलं प्रेयसीच्या वडिलांना ‘सर’ म्हणतात आणि लग्न ठरल्यावर सरळ ‘बाबा’ किंवा ‘पप्पा’ बनवून टाकतात. असं असलं तरी सासू-सास-यांना त्रास देणारे जावई आजही आहेतच. छोटया-छोटया गोष्टींवरून रुसून बसणारे, स्वत:चं महत्त्व वाढवण्यासाठी अनेक गोष्टींमध्ये अडवणूक करणारे, एवढंच काय तर सास-याला लुबाडून संपत्ती बळकावणारे असे अनेक महाभाग आजही आहेतच. पण बायकोचा आणि तिच्या माहेरच्यांचा आदर करणा-या तरुणांचं प्रमाण आजूबाजूला वाढताना दिसतंय. त्यातलंच एक उदाहरण आज समोर आलं आहे.
आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की या तरुणानं असं केलं तरी काय? तर या तरुणानं लग्नात आपल्या सासऱ्यांनी दिलेला हुंडा, पैसे नाकारत समाजासमोर एक आदर्श घालून दिला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तो अतिशय नम्रपणे सासऱ्यांनी दिलेलं नाकारत आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ marathi_remix_reel00 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला “प्रत्येक मुलीच्या बापाला असा जावई मिळावा” असं कॅप्शन लिहलं आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.