व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एका प्रियकराने प्रेयसीला इंम्प्रेस करण्यासाठी आपली गाडी चक्क दोन हजार रुपयांच्या नोटांनी सजवली होती अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी या गाडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. होंडा कंपनीच्या या गाडीवर सर्व ठिकाणी दोन हजाराच्या नोटा लावल्या होत्या. या प्रियकराला त्यानंतर पोलिसांनी अटक देखील केली अशाही चर्चा सोशल मीडियावर होत्या पण या नोटांनी सजवलेल्या गाडीमागचे सत्य आता समोर आले आहे. मुंबईतल्या एका तरुणाने ही गाडी आपल्या प्रेयसासाठी सजवली होती अशी चर्चा होती परंतु ही गाडी मुंबईतली नसून हिंजीवडीमधल्या एका कंपनीची असल्याचे समोर आले आहे.
पिंपरी चिंचवडमधल्या हिंजवडी येथील झूम कार कंपनीने कॅम्पेनसाठी दोन हजारांच्या नकली नोटांनी ही कार सजवली होती. या कारवर ख-या नोटेसारख्या दिसणा-या ७ नोटा होत्या. त्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असे लिहिले होते. या सात नोटा जर शोधून दाखवल्या तर त्याला चौदा हजारांने बक्षीस या कंपनीने ठेवले होते. म्हणूनच ही कार दोन हजारांच्या खोट्या नोटांनी सजवण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी या गाडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. मुंबईतले श्रीमंत लोक पैशांची कशी उधळपट्टी करतात अशा एक ना दोन अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. त्यातून मुंबईत राहणा-या एका तरूणाने प्रेयसीला इंम्प्रेस करण्यासाठी ही गाडी सजवली असल्याची चर्चा होती. पैशांचा अवमान करून प्रेमाचे प्रदर्शन करणा-या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या इथपर्यंतही चर्चा रंगल्या. पण नंतर मात्र या अफवा असून ही गाडी हिंजवाडीमधल्या झूम कार कंपनीचे असल्याचे समोर आले.
नव्या नोटा चलनात आल्यापासून अनेकांची झोप उडालीये तर अनेकांना काळा धंदा करताना तुरुंगाची हवा देखील खावी लागली. मात्र याच नोटांनी झूम कारला चर्चेत ही आणले अन् काही प्रमाणात का होईना फायदा ही करून दिला.