आज ३ मे हा दिवस अतिशय शुभ दिवस आहे. आज अक्षय्य तृतीया आणि रमजान ईद हे दोन सण एकत्र साजरे केले जात आहेत. हे दोन्हीही सण दोन्ही धर्माच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांसंबंधी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून याप्रकरणी एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशावेळी दोन्ही धर्माच्या लोकांनी आपापले सण शांततेत साजरे करावेत यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.
याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजे पुणे पोलिसांनी या सणांच्या शुभेच्छा देण्यासाठी केलेलं एक खास ट्विट. पुणे पोलिसांनी अक्षय्य तृतीया आणि रमजान ईद या दोन्ही सणांच्या शुभेच्छा देणारे एक ट्विट केले आहे. यातील संदेश खूपच खास आहे. विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी एकाच ट्विटमधून ज्या पद्धतीने दोन्ही धर्माच्या लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत, त्यावरून त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
तुम्हाला OK चा फुलफॉर्म माहित आहे का? जाणून घ्या यामागची रंजक तथ्ये
पुणे पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये लिहलंय, “ईदचा चंद्र अक्षय्य होवो! मी चंद्राला विचारले तुला काय बोलावू..? चौदाव्याचा चंद्र, करवा चौथचा चंद्र, की ईदचा चंद्र? चंद्र हसला आणि म्हणाला, मी एकच आहे, फक्त तुझी माझ्याकडे पाहण्याची पद्धत वेगळी आहे! काहीजण आज ईद दानाचे वाटप करतात, तर काही अक्षय्य तृतीयेला दान देतात. यामध्येच बंधुता आहे, यामध्येच धर्म आहे!” दरम्यान, पुणे पोलिसांच्या या ट्विटने सर्वांचेच मन जिंकले असून, या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.