११ सप्टेंबर २००१ साली न्यूयॉर्क येथे जगातील सर्वांत मोठा अतिरेकी हल्ला झाला. न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड टॉवरच्या दोन गगनचुंबी इमारतींवर अतिरेक्यांनी दोन अमेरिकन प्रवासी विमानांच्या साहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यात हजारो लोकांचा मृत्यू झाला. हा हल्ला जगातील सर्वात भयानक अतिरेकी हल्ल्यांपैकी एक मानला जातो. या घटनेमुळे फक्त अमेरिकाच नाही तर संपूर्ण जग हादरले. आता तब्बल २१ वर्षांनंतर या हल्ल्याचा एक न पाहिलेला व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये दिसणारे लोक वर्ल्ड ट्रेड सेंटरला लागलेली आग पाहत आहेत. आधी त्यांना असे वाटत असते की एखाद्या विमानाचा अपघात झाला आहे. तथापि, त्यानंतर लगेचच दुसरे विमान दिसते, जे दुसर्या टॉवरच्या दिशेने वेगाने पुढे जाते आणि आदळल्यानंतर मोठा स्फोट होतो. यानंतर व्हिडीओमध्ये दिसणारे लोक घाबरून ओरडू लागतात. कोणालाही तिथे नक्की काय होत आहे हे समजत नसते.
खेळांमधून हद्दपार केल्यानंतर आता मनोरंजन बंदी!; रशियासंदर्भात Disney, Sony Picturesचा मोठा निर्णय
आत्मघाती हल्लेखोरांनी चार प्रवासी विमान हायजॅक केले, ज्याचा वापर त्यांनी न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टनमधील प्रसिद्ध इमारतींवर हल्ला करण्यासाठी केला. यातील दोन विमाने न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन इमारतींना धडकली. पहिले विमान उत्तर टॉवरला धडकले, तर दुसरे विमान दक्षिण टॉवरला धडकले. यानंतर दोन्ही इमारतींना भीषण आग लागली आणि या आगीत हजारो लोक अडकले. ११० मजली इमारत अवघ्या २ तासात पूर्णपणे कोसळली. यानंतर, तिसरे विमान वॉशिंग्टन डीसीपासून थोड्या अंतरावर असलेल्या अमेरिकन संरक्षण विभागाच्या मुख्यालय पेंटागॉनला धडकले, तर चौथे विमान पेनसिल्व्हेनियाच्या मैदानी भागात कोसळले.
डेली स्टारच्या वृत्तानुसार या अपघातात एकूण २९९६ लोकांचा मृत्यू झाला असून ६००० हून अधिक लोक जखमी झाले. या चार विमानांमध्ये एकूण २४६ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते, ज्यांचा मृत्यू झाला. वर्ल्ड ट्रेड टॉवरच्या दोन्ही इमारती कोसळून २६०६ लोकांचा मृत्यू झाला. पेंटागॉन हल्ल्यात १२५ लोकांचा मृत्यू झाला होता.