वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणारे बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या ग्रेटर नोएडा येथील कथेदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. धीरेंद्र शास्त्री यांची कथा ऐकण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, नोएडा येथे आयोजित करण्यात आलेल्या या कथेदरम्यानचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका मुलीला बॅरिकेडचियी पलीकडे उचलून फेकल्याचं दिसत आहे.
व्हिडीओमध्ये, आचार्य धीरेंद्र शास्त्री व्यासपीठावर बसल्याचे दिसत आहेत, यावेळी एक मुलगी बॅरिकेड ओलांडताना दिसत आहे. मुलीने बॅरिकेड ओलांडताच तिथे उपस्थित एक व्यक्ती त्या मुलीच्या जवळ येतो आणि तिला उचलून थेट बॅरिकेडच्या पलीकडे फेकतो. आश्चर्याची बाब म्हणजे यावेळी तिथे काही पोलिसही उपस्थित असल्याचे दिसत आहेत. मात्र, ते काहीही कृती करत नाहीत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच नागरिकांनी संताप व्यक्त करत त्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
संजय त्रिपाठी नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिलं आहे, “कचऱ्याच्या पोत्याप्रमाणे एका मुलीला बॅरिकेडच्या पलीकडे फेकले जात आहे. धन्य आहेत आचार्य धीरेंद्र शास्त्री, ज्यांच्यासमोर त्यांचे गुंड असे कृत्य करत आहेत. या मुलीने कोणती चूक केली होती, म्हणून तिला अशी शिक्षा दिली? आता कुठे आहेत ठेकेदार? आहे का काही उत्तर? लाज वाटू द्या.” व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण व्हिडीओवर कमेंट करत आहेत.
नीरज पांडे नावाच्या युजरने लिहिले, ”एका महिलेसोबत अश्लील वर्तन केले. पुरुष सहकाऱ्याने तिला उचलून बॅरिकेडच्या पलीकडे फेकले. बाबा, तुम्ही कथा सांगत आहात की भक्तांबरोबर गुंडगिरी करण्यात पुढाकार घेत आहात.” या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नोएडा पुलिसांनी त्याची दखल घेतली आहे. या घटनेतील व्यक्तीची ओळख पटवली जात असून पीएस सूरजपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच नोएडा पोलिसांनी व्हिडिओत दिसणाऱ्या पोलिसांवरही निष्काळजीपणाबद्दल कारवाई केली असल्याचंही माहिती पोलिसांनी दिली आहे