सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक खासदार संसदेत सर्वांसमोर कपडे काढताना दिसत आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेपाळमधील असून तेथील अपक्ष खासदार अमरेश कुमार सिंह यांनी सोमवारी सर्वांसमोर शर्ट आणि बनियान काढले. सभागृहात बोलण्यासाठी वेळ दिला जात नसल्याचा आरोप करत त्यांनी हे कृत्य केलं आहे.
सिंह हे नेपाळी काँग्रेसचे माजी नेते आहेत. मागील वर्षी त्यांनी सरलाहीमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. कारण त्यांना नेपाळी काँग्रेसकडून तिकीट देण्यात आले नव्हते. तर लोकप्रतिनिधी सभागृहाचे (HoR) अध्यक्ष देवराज घिमिरे यांनी सिंह यांना बोलू न दिल्याने त्यांनी सर्वांसमोर आपले कपडे काढल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, सभागृहाचे अध्यक्ष घिमिरे यांनी, सभागृहात शांततेने वागला नाही तर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सिंह यांना दिला होता.
कपडे काढण्याआधी खासदार काय म्हणाले?
अंगावरील कपडे काढण्यापूर्वी सिंह म्हणाले, “भ्रष्टाचाराविरोधात बोलण्यासाठी मी शहीद व्हायला तयार आहे.” यावेळी घिमिरे यांनी त्यांना संसदीय मर्यादांचे भान राखण्यास सांगितले. मात्र, सिंग यांनी घिमिरे यांचे म्हणणे न ऐकता अंगावरील कपडे काढण्यास सुरुवात केली. त्यावर तेथे उपस्थित इतर खासदारांनी सिंह यांची वैद्यकीय चाचणी करावी, अशी मागणी केली. यानंतर सिंह यांनी सभागृह सोडले. नेपाळच्या संसदेत अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने, प्रतिनिधी सभागृहाच्या बैठकीत स्पीकरने भ्रष्टाचारावर बोलू दिले नाही, म्हणून खासदार अमरेश कुमार सिंह यांनी कपडे काढली असल्याचं म्हटलं आहे. तर आणखी एकाने म्हटले की, ‘प्रतिनिधी सभागृहाचे अध्यक्ष देवराज घिमिरे यांनी त्यांना संसदेत बोलू दिले नाही, त्यामुळे नेपाळचे खासदार अमरेश कुमार सिंह यांनी कपडे काढले. या घटनेच्या व्हिडिओमध्ये सिंह रागाच्या भरात शर्ट काढताना दिसत आहेत.